मुंबई: देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने कर्ज आणि ठेवींच्या व्याजदरात बदल जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळणार असून काही ठराविक मुदत ठेवींवरील व्याजदरात मात्र थोडी कपात करण्यात आली आहे. हे नवे दर 15 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.
advertisement
ठेवींवरील व्याजदरात काय बदल?
3 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या बहुतांश रिटेल मुदत ठेवींवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र एसबीआयच्या लोकप्रिय 444 दिवसांच्या ‘अमृत वृष्टी’ एफडी योजनेवरील व्याजदर 6.60 टक्क्यांवरून 6.45 टक्के करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी बहुतांश कालावधीतील व्याजदर अजूनही सामान्य नागरिकांपेक्षा जास्त आहेत. मात्र 2 ते 3 वर्षांच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांसाठीचा दर 6.95 टक्क्यांवरून 6.90 टक्के करण्यात आला आहे. सामान्य नागरिकांसाठी याच कालावधीतील एफडीचा दर 6.45 टक्क्यांवरून 6.40 टक्के झाला आहे.
कर्जदारांसाठी मोठा दिलासा
कर्जाच्या बाबतीत एसबीआयने चांगली बातमी दिली आहे. बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर (MCLR) मध्ये 5 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. एक वर्षाचा एमसीएलआर आता 8.75 टक्क्यांवरून 8.70 टक्के झाला आहे. ओव्हरनाईट, एक महिना, तीन वर्षे अशा इतर कालावधीतील एमसीएलआर दरही कमी करण्यात आले आहेत.
याशिवाय, गृहकर्जासारख्या फ्लोटिंग रेट कर्जांसाठी लागू असलेल्या ईबीएलआर (External Benchmark Linked Rate) मध्ये 25 बेसिस पॉइंट्सची मोठी कपात करण्यात आली आहे. हा दर आता 8.15 टक्क्यांवरून 7.90 टक्के झाला आहे.
जुने कर्जदार ज्या बेस रेटवर कर्ज घेत आहेत, त्यांच्यासाठीही बेस रेट 10.00 टक्क्यांवरून 9.90 टक्के करण्यात आला आहे.
ग्राहकांसाठी याचा अर्थ काय?
या बदलांचा थेट फायदा गृहकर्ज आणि इतर फ्लोटिंग रेट कर्जदारांना होणार असून त्यांच्या ईएमआयमध्ये घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्यांचे व्याजदर रीसेट होणार आहेत त्यांना दिलासा मिळेल. दुसरीकडे मुदत ठेवी करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी परतावा मोठ्या प्रमाणात स्थिरच राहणार आहे. फक्त काही ठराविक योजना आणि कालावधींमध्येच किरकोळ कपात झाली आहे.
