उज्वला करवळ लिलावती कॉलेजमध्ये आयटी विभागप्रमुख (HOD) म्हणून काम करत होत्या. मात्र, कोरोनाकाळात घरी बसून ऑनलाईन काम करताना त्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय उभा करण्याची इच्छा अधिक दृढ झाली. हेल्दी आणि इनोव्हेटिव्ह फूड प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार त्यांनी मनात पक्का केला आणि त्यातूनच त्यांच्या उद्योजकीय प्रवासाची सुरुवात झाली.
advertisement
सुरुवातीला थालीपीठ भाजणी, तीन डाळींचा हेल्दी ढोकळा असे काही निवडक प्रॉडक्ट्स करून त्यांनी कुटुंबीय आणि मैत्रिणी यांच्याकडे पाठवले. चव आणि गुणवत्ता यामुळे यांना मोठी पसंती मिळाली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स आणि हेल्दी फूड प्रॉडक्ट्स बनवण्यास सुरुवात केली.
आज उज्वला करवळ यांचे 70 पेक्षा अधिक प्रॉडक्ट्स बाजारात उपलब्ध आहेत. नाचणी सत्व, ज्वारीचे अप्पे, ज्वारी इडली, मिलेट रवा, पंचडाळी डोसा, कढीपत्ता चटणी, डिंक लाडू, पौष्टिक लाडू अशा विविध पदार्थांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. या कामात बचत गटातील 12 महिलांचा सक्रिय सहभाग असून बारामती, सांगली, कोल्हापूरसह विविध जिल्ह्यांत आणखी महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
आयटी क्षेत्रातून खाद्यउद्योगात प्रवेश करणे सोपे नव्हते, परंतु उज्वलांनी प्रत्येक आव्हानाला सामोरे जात व्यवसायाला स्थिरता दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवात एकटीने केली. वाट कठीण होती. पण सातत्य आणि गुणवत्ता यामुळे आज वार्षिक उलाढाल 60 ते 70 लाख रुपये होते.
स्वप्न बघितलं तर ते पूर्ण करण्याची ताकद आपल्यात असते. फक्त सातत्य आणि मेहनत हवी. उज्वला यांचा स्वाद महिला बचत गट हा उद्योग महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असून आत्मनिर्भरतेचे आदर्श उदाहरण ठरत आहे.