सोलापूर – महिलांना कुटुंबीयांनी पाठिंबा दिल्यास त्या कोणत्याही कार्यात हमखास यशस्वी होतात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अनगरच्या डॉ. स्वाती थिटे होय. काळाच्या ओघात लोप पावत असणाऱ्या माडग्याची चव त्यांनी कुटुंबीयाच्या मदतीनं लोकांना चाखायला दिलीये. जात्यावर दळून तयार केलेल्या तिखट आणि गोड हुलग्याच्या माडग्याचा वसुंधरा ब्रँडला मोठी मागणी आहे. याबाबत लोकल18 सोबत बोलताना डॉ. स्वाती थिटे यांनी माहिती दिलीये.
advertisement
मोहोळ तालुक्यातील अनगर येथे राहणाऱ्या डॉ. स्वाती थिटे हे गेल्या 4 वर्षापासून घरगुती माडगे बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. पारंपारिक पद्धतीने जात्यावर हुलगा दळून त्यांचे पीठ चुलीवर शिजवून माडगे हा पदार्थ तयार केला जातो. हुलग्याच्या माडग्यामुळे कफ, वात आणि मेद कमी होतो. आयुर्वेदात आजारी व्यक्तीस हुलग्याचे कढण दिले जाते. पूर्वी घराघरांत माडगे आरोग्य चांगले राहाण्यासाठी कायम आहारात असायचे, विशेषतः कणकण, सर्दी-पडसे यावर ते गुणकारी मानले जाते.
एका लग्नाची अनोखी गोष्ट, अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर, जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान
कसे बनते माडगे?
माडगे बनविण्यासाठी एक किलो हुलगे स्वच्छ करून लोखंडी तव्यावर भाजले जातात. थंड झाल्यानंतर जात्यावर दळून त्याचे बारीक पीठ तयार करतात. हे पीठ चाळणीने चाळले जाते. तिखट माडग्यासाठी एक किलो हुलगा पीठ, 15 ग्रॅम तिखट, 7 ग्रॅम हळद, 15 ग्रॅम जिरेपूड, 15 ग्रॅम धनेपूड, 40 ग्रॅम सैंधव मीठ आणि 10 ग्रॅम ओवा मिसळून एकत्रित केले जाते. त्यानंतर प्रत्येकी 100 ग्रॅमचे पॅकिंग तयार केले जाते. गोड माडग्यासाठी याच पद्धतीने जात्यावर हुलगा दळून पीठ करतात. 500 ग्रॅम पिठामध्ये 500 ग्रॅम सेंद्रिय गूळ, 20 ग्रॅम वेलदोडा, 20 ग्रॅम जायफळ, 50 ग्रॅम बडीशेप, 5 ग्रॅम सैंधव मीठ मिसळून एकत्रित केले जाते.
महिन्याला 40 हजारांचा नफा
माडग्यासाठी तयार पीठाचे पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. 100 ग्रॅमच्या एका माडग्याच्या पाकिटाची किंमत 120 ते 150 रुपये आहे. सोलापूर शहर व जिल्हासह मुंबई, पुणे, लातूर, कर्नाटक, सांगली येथून सुध्दा ग्राहकांची या माडग्याला चांगली मागणी आहे. या माडगे विक्रीच्या व्यवसायातून डॉ.स्वाती थिटे या महिन्याला एक लाख रुपयांची उलाढाल करत आहेत. तर सर्व खर्च वजा करून महिन्याला 30 ते 40 हजार रुपये पर्यंतचा नफा त्यांना मिळत आहे.
महिलांनी पुढे येण्याची गरज
“आज महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यास भरपूर संधी आहे. फक्त तिला गरज प्रोत्साहन देण्याची आहे. जेव्हा एखादे कुटुंब घरातील महिलेला प्रोत्साहन देते, तेव्हा स्त्रिया खूप काही करू शकतात. त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. त्यामुळे यासाठी महिलांनी पुढे येणे गरजेचे आहे”, असं डॉ.स्वाती थिटे यांनी व्यक्त केला आहे.