अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद असं या आरोपीचं नाव असून शुक्रवारी मुंबई गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तचर विभागाने त्याला वर्सोवा येथील त्याच्या घरातून अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्याकडून देशातील प्रमुख अणुऊर्जा केंद्र असलेल्या बार्कचे दोन बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहेत. दोन्हीवर वेगवेगळी नावं आहेत.
"एका ओळखपत्रावर अलेक्झांडर पामर, तर दुसऱ्यावर अली रझा हुसेन असं नाव होतं," असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने त्याला जुन्या नावाने परदेशात जाणं शक्य नव्हतं, त्यामुळे त्याने अशाप्रकारे बनावट ओळखपत्रं तयार केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला भौतिकशास्त्र आणि हेरगिरीचे दीर्घकाळापासून आकर्षण होते. तो स्वतःला गुप्तहेर किंवा अणुतज्ज्ञ असल्याची ओळख करून द्यायचा. अहमदने यापूर्वी आखाती देशांमध्ये तेल आणि मार्केटिंग कंपन्यांमध्ये काम केलं आहे. २००४ मध्ये त्याला दुबईतून हद्दपार करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्यावर भारताबद्दलची "संवेदनशील माहिती" विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. तथापि, पोलीस, केंद्रीय संस्था आणि अणुऊर्जा विभाग (DAE) यांनी केलेल्या चौकशीत तो दोषी आढळला नाही.
पोलिसांनी सांगितले की, त्याच्या ताज्या कृतीत, अहमदने परदेशी नागरिकांना भेटण्यासाठी, परदेशात प्रवास करण्यासाठी आणि आपल्याकडे गोपनीय डेटाचा अॅक्सेस आहे, हे भासवण्यासाठी आणि पैसे घेण्यासाठी बनावट आयडी कार्डचा वापर केला. त्याच्याकडून नकाशे आणि इतर संशयास्पद कागदपत्रे देखील जप्त करण्यात आली आहेत. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.