उद्या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिका क्षेत्रामध्ये निवडणूक पार पडणार आहे. त्यापैकीच एक म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. महानगरपालिका मतदानाच्या कामांमध्ये गुंतलेल्या मतदान अधिकारी आणि कर्मचार्यांसाठी मुंबई मेट्रोच्या 'अॅक्वा लाईन'ने (मेट्रो-3) गुरुवारी विशेष अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मेट्रोचा हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने फारच लाभदायक ठरणार आहे. निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी मेट्रोची सेवा पहाटे 5:00 वाजल्यापासूनच सुरू होणार आहे. तर, रात्री उशिरापर्यंत कामावरून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा मध्यरात्री 12:00 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
advertisement
दरम्यान, सामान्य दिवसांच्या तुलनेत मतदानाच्या दिवशी या विशेष फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. आरे ते कफ परेड मार्गावर धावणारी 'अॅक्वा लाईन' मेट्रो-3 गेल्या तीन महिन्यांपासून पुर्ण क्षमतेने धावत आहे. पुर्ण क्षमतेने धावणाऱ्या या मेट्रोमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 या तीन महिन्यांच्या काळामध्ये एक कोटी 29 लाख 78 हजार 262 प्रवाशांनी प्रवास केला आहे. हाच आकडा सप्टेंबर 2025 पर्यंत फार कमी होता. तेव्हा 19 लाख 70 हजार प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास करत होते. आरे ते कफ परेड मेट्रो सुरू झाल्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये 38 लाख 63 हजार 741 प्रवाशांनी प्रवास केला आहे.
