15 जानेवारी रोजी मुंबईमध्ये होणार्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 14 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून वाहतुकीसाठी काही निर्बंध लादण्यात आले आहे. निर्बंध लावण्यात आलेल्या रस्त्यांची वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवण्यात आली आहे. 16 आणि 17 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीचे निर्बंध लागू राहणार आहेत. 14 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून शनिवार, 17 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीचे निर्बंध कायम राहणार आहेत. मुंबई पोलिसांनी दादर पश्चिम, वरळी आणि पश्चिम उपनगरातील काही भागात तात्पुरते वाहतूक वळवण्याचे आदेश दिले आहेत.
advertisement
दादर पश्चिमेकडील भागात, बुधवार, 14 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते शुक्रवार, 16 जानेवारी रोजी रात्री 11 वाजेपर्यंत राव बहादूर एस.के.बोले मार्ग, अशोक वृक्ष रोड आणि रानडे रोडवर प्रवेश आणि पार्किंग करण्यास इतर नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. फक्त रहिवासी आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच परवानगी असेल. वरळीतल्या डॉ. ई. मोझेस रोडवर शुक्रवारी (16 जानेवारी) सकाळी 5 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत प्रवेश आणि पार्किंगला बंदी असेल कारण बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या अभियांत्रिकी केंद्रातील स्ट्राँग रूममध्ये मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.
वरळी येथील जी.एम.भोसले मार्गावर बुधवारी रात्री 12:01 वाजेपासून गुरुवार मध्यरात्रीपर्यंत इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम व्होटिंग मशिनचे वितरण आणि संकलन महत्त्वाचे असणार आहेत. सांताक्रूझसह पश्चिम उपनगरांमध्येही अशाच प्रकारचे निर्बंध असतील. सार्वजनिक रस्त्यांजवळील अनेक मतदान केंद्रांमुळे गुरुवारी एनएस रोड क्रमांक ०६ आणि टीपीएस रोड क्रमांक ०३ तात्पुरते बंद राहतील. शुक्रवारी मतमोजणीमुळे सांताक्रूझमधील रिलीफ रोड पूर्णपणे बंद राहील. बृहन्मुंबई महानगर पालिका निवडणूक 2026 सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी शहरात 28,000 हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. यामध्ये 3000 पोलिस अधिकारी आणि 25,000 पोलिस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत.
तसेच राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), जलद प्रतिसाद पथके (क्यूआरटी), बॉम्ब शोधक आणि नाशक पथके (बीडीडीएस), जलद नियंत्रण पोलिस पलटण आणि गृहरक्षक दल यांसारख्या विशेष तुकड्यांचाही निवडणूकीसाठी समावेश आहे. मुंबईकरांना निवडणूकीच्या काळात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचार्यांना आणि अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिक 100 किंवा 112 वर कॉल करू शकतात.
