वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपने मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म दिला होता, पण तरीही खामकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी हुकली. फॉर्म भरण्यासाठी मंदाकिनी खामकर 15 मिनिटं उशीरा पोहोचल्या, त्यामुळे निवडणूक आयोगाने खामकर यांचा अर्ज दाखल करून घेतला नाही. दुसरीकडे वॉर्ड क्रमांक 211 मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती, पण कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अन्सारी यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला गेला नाही.
advertisement
मनसेचा विजय सोपा झाला?
वॉर्ड क्रमांक 212 मध्ये मंदाकिनी खामकर यांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे या वॉर्डातला मनसेचा विजय सोपा झाल्याची चर्चा आहे. या वॉर्डामध्ये मनसेच्या श्रावणी हळदणकर यांना ठाकरे बंधूंच्या युतीतून उमेदवारी मिळाली आहे. तर याच वॉर्डात अरुण गवळीची कन्या आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच काँग्रेस आणि अपक्षांनीही उमेदवार रिंगणात उतरवले असले तरीही मनसेच्या श्रावणी हळदणकर यांचं पारडं जड वाटत आहे.
मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू
मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप-शिवसेना महायुतीचा सामना ठाकरे बंधूंविरुद्ध होत आहे. याचसोबत मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचीही युती झाली आहे. मुंबईतल्या 227 जागांपैकी भाजप 137 आणि शिवसेना 90 जागांवर लढत आहे. तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शिवसेना उबाठा 163, मनसे 53 आणि राष्ट्रवादी शरद पवार 11 जागांवर लढेल. काँग्रेसने 155 आणि वंचित बहुजन आघाडीने 62 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
