मेंहदी लावल्याने वर्गात बसू न देणारी शाळा चर्चेत
घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी सोमवारीच शाळेला भेट देत संपूर्ण चौकशी केली. प्राथमिक चौकशीत काही विद्यार्थिनींना मेहंदी लावल्याने वर्गात प्रवेश नाकारल्याचे लक्षात आल्याने शिक्षण विभागाने शाळेला थेट नोटीस बजावली आहे. मेहंदीमुळे वर्गात बसू न देणे हे नियमबाह्य आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारे आहे,असे स्पष्ट नमूद करत शाळेला मंगळवारी लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
advertisement
शाळेने असा प्रकार घडल्याचा आरोप फेटाळला
दरम्यान, शाळेने असा प्रकार घडल्याचे पूर्णपणे नाकारला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, शाळेत असा कोणताही प्रसंग घडलेला नाही. विद्यार्थिनींना फक्त शिस्तीचे नियम पाळण्यास सांगितले. शिक्षण विभागाची नोटीस अद्याप आम्हाला मिळालेली नाही. मात्र, पालकांचे वेगळे दावे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करत आहेत.
पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार, काही विद्यार्थिनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हातावर मेहंदी लावून शाळेत गेल्या असता त्यांना वर्गात बसण्यास नकार देण्यात आला. शिक्षकांनी त्यांना मेहंदी काढल्याशिवाय वर्गात प्रवेश न देण्याचा इशारा दिला, असे पालकांनी म्हटले आहे. त्यामुळे काही विद्यार्थिंनी मानसिक तणावात गेल्या असून रडत रडत शाळेबाहेर पडल्या.
हा प्रकार समोर येताच सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली. मेहंदीवर बंदी म्हणजे संस्कृतीवर बंदी ,मुलींच्या स्वातंत्र्यावर गदा, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी शाळेच्या निर्णयाला पाठिंबा दिला असून त्यांनी शिस्तीच्या नावाखाली नियमांचे पालन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, शिक्षण विभागाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली असून नियम मोडले असल्याचे आढळल्यास शाळेविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत मिळत आहेत.
