भरधाव गाडी चालवणं, विना परवाना गाडी चालवणं असे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमुळे अनेकांच्या आयुष्याचं नुकसान होतं. मुंबईतील एक घटनेत 28 वर्षीय अक्षय पटेल या सॉफ्टवेअर इंजिनिअरनं कारने यू-टर्न घेताना एका महिलेला धडक दिली. यात महिलेचा मृत्यू झालाय.
मृत्यू झालेल्या महिलेचं नाव पूनम खारवा (36) असून ती एकल पालक होती. तिच्या चार अल्पवयीन मुलांसह ती एल्फिन्स्टन उड्डाणपुलाखाली राहत होती. मंगळवारी (30 जुलै) संध्याकाळी मुलांसाठी जेवण आणण्याकरता ती निघाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय पटेल सहकाऱ्याची एसयूव्ही कार चालवत होता. सहकारी देखील त्याच्यासोबत कारमध्ये होता. उड्डाणपुलाखालून यू-टर्न घेताना रस्ता ओलांडणाऱ्या पूनम यांना त्याच्या कारने धडक दिली. यामुळे पूनम दुभाजकावर पडल्या व त्यांच्या डोक्याला मार लागला. पटेल यानेच त्यांना नायर रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
पूनम यांच्या नवऱ्याचा सहा वर्षांपूर्वीच एका आजाराने मृत्यू झालाय. त्यांना तीन, सात, 10 आणि 14 वर्षांची अशी चार मुलं आहेत. आधी ते कुर्ला येथील चाळीत राहायचे. नवऱ्याच्या निधनानंतर वर्षभर ते तिथे राहिले, पण भाडं भरलं नसल्यानं घरमालकानं त्यांना तिथून काढून टाकलं. मग ते उड्डाणपुलाखाली राहू लागले. महिलेचा 14 वर्षीय मुलगा साहिलनं सांगितलं, की दादर फुलबाजारातून तो रोज फुलं आणायचा व त्याची आई गजरे बनवायची. संध्याकाळी ते गजरे ट्रॅफिक सिग्नलवर विकायचं काम करायचे. पूनम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांना ताडदेवमधील त्यांच्या एका काकांच्या घरी ठेवण्यात आलं आहे.
चालक अक्षय पटेलवर एफआयआर दाखल करण्यात आलाय. एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक अक्षय पटेल याच्याकडे केवळ लर्निंग लायसन्स आहे. पोलिसांनी चालक पटेल याला एक नोटीस पाठवली असून चौकशीला बोलावल्यावर उपस्थित राहण्यास त्यात सांगितलं आहे. त्याच्यावर निष्काळजीपणा आणि अतिवेगाने गाडी चालवल्याचा आरोप आहे. तसंच वैध ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय सार्वजनिक ठिकाणी गाडी चालवल्याचाही आरोप आहे.
