होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 70 जण जखमी झाले. भावेश भिंडे याने महापालिकेच्या ऑडिटरकडूनच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा अहवाल रेल्वे पोलिसांना सादर केला होता. याच अहवालाच्या आधारे त्याला होर्डिंगसाठी परवानगी दिली होती. मात्र, आकाराचा नियम मोडून तब्बल 120 फूटांचे होर्डिंग उभारण्यात आलं होतं. मुंबईतील 20 टक्के मोठे होर्डिंग्ज हे भावेश भिंडेच्या मालकीचे असल्याची धक्कादायक माहितीसुद्धा समोर येतेय.
advertisement
भावेश भिंडे याच्यावर बलात्कार, विनयभंगासह वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्याला बीएमसीने 21 वेळा दंडही ठोठावला होता. चेक बाऊन्स प्रकरणी त्याच्यावर दोन गुन्हे आहेत. परवानगीशिवाय होर्डिंग लावल्याप्रकरणी त्याच्यावर कलम 471 नुसार दंडात्मक कारवाईसुद्धा केली होती.
2009 मध्ये भावेश भिंडेने विधानसभा निवडणूक लढली होती. अपक्ष म्हणून निवडणूक लढलेल्या भावेश भिंडेचा पराभव झाला होता. त्याला केवळ 1 हजार 411 मते मिळाली होती.
होर्डिंग कोसळलं तिथे असलेला पेट्रोल पंप बीपीसीएल कंपनीचा असून 10 डिसेंबर 2021 पासून सुरू आहे. या पेट्रोल पंपाच्या शेजारीच 10 वर्षांच्या भाडेतत्तावर जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी दिली गेली होती. धक्कादायक बाब म्हणजे दुर्घटनेच्या आदल्या दिवशीच भावेश भिंडेच्या याला पालिकेकडून 6 कोटी 13 लाख 84 हजार 464 रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली होती. 8 एप्रिल 2022 पासून भिंडेने कोणत्याही परवानगी शिवाय 8 होर्डिंग उभारल्याप्रकरणी त्याला नोटीस बजावली गेली होती.
