या नव्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा असणार आहेत. आतापर्यंतच्या एसी लोकलपेक्षा या लोकल अधिक अत्याधुनिक असतील. प्रवाशांच्या आरामासाठी गादीयुक्त आसने, प्रत्येक डब्यात मेट्रोप्रमाणे मोबाइल चार्जिंग पॉइंट्स, तसेच गर्दीनुसार वातावरण नियंत्रित करण्याची क्षमता असलेली अत्याधुनिक एचव्हीएसी प्रणाली यांचा समावेश असेल. यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास न होता प्रवास अधिक आरामदायी होणार आहे.
advertisement
गाड्यांच्या कार्यक्षमतेतही मोठी सुधारणा करण्यात येणार आहे. या लोकलमध्ये वाढीव विद्युत शक्ती असणार असून त्यामुळे गाड्या 130 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकतील. यामुळे स्थानकांदरम्यान प्रवासाचा वेळ कमी होईल. दरवाजे उघडणे आणि बंद करण्यासाठी होणारा वेळेचा अपव्यय नवीन तंत्रज्ञानामुळे कमी होणार आहे. एमयूटीपी-3 अंतर्गत 47 तर एमयूटीपी-3ए अंतर्गत तब्बल 191 एसी लोकल खरेदी केल्या जाणार आहेत. या निविदेत 12 आणि 15 डब्यांच्या लोकलसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे दोन नवीन ईएमयू कारशेडची उभारणी. नव्या लोकलच्या देखभालीसाठी आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेसाठी भिवपुरी येथे तर पश्चिम रेल्वेसाठी वाणगाव येथे ही कारशेड उभारली जाणार आहेत. यामुळे एसी लोकलच्या कार्यक्षम देखभालीला चालना मिळेल. विशेष म्हणजे ही कारशेड त्याच कंत्राटदारामार्फत चालविली जाणार आहेत, ज्याला एसी लोकलचे कंत्राट मिळेल.
निविदा प्रक्रियेनंतर कंत्राटदार निवडण्यासाठी 3 ते 6 महिने लागतील. त्यानंतर दोन वर्षांच्या आत पहिली नमुना लोकल तयार होईल आणि पुढील मंजुरी प्रक्रिया सुरू होईल. यामुळे काही वर्षांत मुंबईकरांना अत्याधुनिक,जलद आणि आरामदायी लोकल प्रवासाचा अनुभव घेता येईल.
एकूणच पाहता, मुंबईकरांसाठी ही खुशखबर ठरणार आहे. दैनंदिन प्रवासातील थकवा, गर्दी आणि असुविधा कमी करण्यासाठी ही लोकल ट्रेन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वाढत्या प्रवासीसंख्येला तोंड देण्यासाठी आणि भविष्यातील प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी हा प्रकल्प मोठा टप्पा मानला जात आहे. आगामी काळात मुंबईकरांसाठी ही एसी लोकल खऱ्या अर्थाने सुपर लोकल ठरेल यात शंका नाही.