ड्रेनेज सफाईच्या कामात होणाऱ्या मजुरांच्या मृत्यूची मालिका अद्याप थांबलेली नाही. गोरेगाव येथील मेगा मॉल परिसरात मंगळवारी मध्यरात्री ड्रेनेज साफ करत असताना दोन मजूर गुदमरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत एका मजुराचा मृत्यू झाला असून, दुसऱ्या मजुराची प्रकृती चिंताजनक आहे.
नेमकं काय घडलं?
ही घटना गोरेगाव पश्चिम येथील मेगा मॉलजवळ मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास घडली. एका खासगी कंपनीने ड्रेनेज सफाईचे काम हाती घेतले होते. कामाचा भाग म्हणून दोन मजूर ड्रेनेजमध्ये उतरले होते. मात्र, आतमध्ये साचलेल्या विषारी वायूमुळे या दोन्ही मजुरांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला आणि ते तिथेच गुदमरले.
advertisement
एकाचा मृत्यू, दुसऱ्यावर उपचार सुरू
घटनेची माहिती मिळताच दोघांनाही बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुर्दैवाने एका मजुराचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दुसऱ्या मजुराला जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हे दोन्ही मजूर एका खासगी कंत्राटदाराकडे काम करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ड्रेनेजमध्ये उतरण्यापूर्वी त्यांना आवश्यक सुरक्षा साधने दिली होती का? विषारी वायूचा धोका तपासला होता का? याची चौकशी सुरू आहे.
