हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन तास मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी वीज कडकडाट, वाऱ्याचा जोर आणि विजेचा कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे किनारपट्टी भागात तसेच निचांकी भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई आणि उपनगरांमध्ये वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा आणि रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, अशी सूचना बीएमसीकडूनही करण्यात आली आहे.
advertisement
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातही मुसळधार पावसाचा जोर दिसून येण्याची शक्यता आहे. या भागात आधीच काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेले असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरातही हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ झाले असून, सायंकाळी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. विशेषतहा कात्रज, सिंहगड रस्ता, बाणेर, विमाननगर परिसरात वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो. पावसामुळे रस्त्यांवर घसरडी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे दुचाकीस्वारांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील निचांकी भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. दरवर्षी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे यंदाही वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या या हायअलर्टनंतर नागरिकांनी सोशल मीडियावरून पावसाची माहिती तपासून मगच प्रवासाला निघावे, तसेच शक्य असल्यास ऑफिसमधून लवकर बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी पोहोचावे, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.