मेट्रो लाईन-9 लवकरच प्रवाशांच्या सेवेत
गेल्या दोन महिन्यांपासून एमएमआरडीए आणि राज्य सरकार स्तरावर मेट्रोच्या उद्घाटनासाठी तयारी सुरू होती. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची योजना होती. मात्र महापालिका निवडणुकांसाठी आचारसंहिता अपेक्षेपेक्षा आधी लागू झाल्याने उद्घाटनाला उशिर झाला आहे. त्यामुळे आता 15 जानेवारीनंतर मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
advertisement
मेट्रो-9 ही मेट्रो लाईन-7 ची वाढीव सेवा असून ऑक्टोबर 2024 मध्ये लाईन-7 सुरु करण्यात आली होती. या एकत्रित कॉरिडॉरमुळे मीरा-भाईंदरहून अंधेरीपर्यंत प्रवाशांना इंटरचेंज न करता प्रवास करता येणार आहे. भविष्यात ही लाईन थेट विमानतळापर्यंत वाढवण्यात येणार असून तिला लाईन-7ए असे नाव देण्यात येईल. सप्टेंबर 2025 पर्यंत या कामाचे सुमारे 62 टक्के काम पूर्ण झाले आहे.
किती असतील स्थानकं?
मेट्रो-9 च्या पहिल्या टप्प्यात 4.5 किमी लांबीचा मार्ग असून चार स्थानके असतील. पुढील टप्प्यात आणखी चार स्थानकांचा समावेश करून लाईन भाईंदरमधील सुभाषचंद्र बोस स्टेडियमपर्यंत नेण्यात येणार आहे. सुमारे 6,607 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारली जाणारी ही मेट्रो प्रकल्प दहिसर, मीरा रोड आणि भाईंदरमधील लाखो प्रवाशांसाठी सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय ठरणार आहे.
