सर्वसामान्यांसाठी स्वप्न का बनतंय दुःस्वप्न?
मुंबईत म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत उपलब्ध करण्यात आलेली घरे सर्वसामान्यांच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेल्याचे समोर आले आहे. मुंबई मंडळाने या योजनेतील तब्बल 125 घरांच्या किमती निश्चित केल्या असून या दरांमध्ये मागील वर्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते.
नव्या किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्
advertisement
ठरवण्यात आलेल्या किमतींनुसार घरांचे दर किमान 36 लाख 39 हजार रुपयांपासून थेट 7 कोटी 58 लाख रुपयांपर्यंत आहेत. विशेष म्हणजे यातील काही घरे दीड कोटी ते साडेसात कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याने मध्यमवर्गीय तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही घरे केवळ स्वप्न ठरत आहेत, त्यामुळे प्रथम प्राधान्य योजनेतून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आता फेल ठरत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
ताडदेव येथील क्रिसेंट टॉवरमधील घरांची किंमत पहिल्या सोडतीत साडेसात कोटी रुपये होती. त्यावर तीव्र टीका झाल्यानंतर पुढील सोडतीत दर कमी करण्यात आले होते. 2024 मधील सोडतीत ही किंमत 6 कोटी 77 लाख ते 6 कोटी 82 लाख रुपयांपर्यंत होती. मात्र आता पुन्हा दरवाढ करण्यात आली असून प्रथम प्राधान्य योजनेत या घरांची किंमत 7 कोटी 58 लाख रुपये ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचप्रमाणे जुहू येथील उच्च उत्पन्न गटातील घरांचे दरही चार कोटींहून अधिक वाढून पाच कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
