म्हाडा कोकण मंडळाने ठाणे शहर आणि जिल्ह्यासह वसई परिसरातील 5285 घरांची लॉटरी प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये वेगवेगळ्या राखीव गटांप्रमाणे आजी-माजी आमदार आणि खासदार यांच्यासाठी 95 राखीव घरे असणार आहेत. अल्प उत्पन्न गटातील या घरांच्या किमती साडेनऊ लाख ते 11 लाख रुपयांच्या दरम्यान असणार आहेत. तर आमदाराचे सध्याचे वेतन महिन्याला एक लाखापेक्षा जास्त असून महागाई भत्ता वेगळा दिला जातोय. म्हाडाचे साडेनऊ लाखाचे घर कल्याणमध्ये असून कोणता आमदार अत्यल्प उत्पन्न गटात आहे? आणि कोण या घरांसाठी अर्ज करतो? याबाबत उत्सुकता आहे.
advertisement
MHADA Lottery: म्हाडाच्या घरासाठी पात्रता काय? अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
दरम्यान, म्हाडाकडे याबाबत विचारणा केली असता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम 1976 नुसार उत्पन्न गटानुसार आमदार-खासदारांसाठी घरे राखीव ठेवावी लागतात. या घरांसाठी आमदार-खासदारांकडून अर्ज न आल्यास ती खुल्या वर्गातील अर्जदारांना उपलब्ध होतात, असं म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राखीव घरे आणि किंमत
ठिकाण - उत्पन्न गट - किंमत (लाखांत) घरांची संख्या
कल्याण - अत्यल्प - 9.55 ते 11.31-1
टिटवाळा - अल्प - 17.18 ते 30.56-1
नवी मुंबई - अत्यल्प - 8.59-2
कल्याण - अत्यल्प - 19.60 ते 19.95- 1
विरार - अत्यल्प - 13.29-1
ठाणे - अल्प - 20 ते 21- 1
वसई - अल्प - 14 ते 18- 1
कल्याण - अल्प - 21 ते 22- 49
शिरढोण - अल्प - 35.66- 11
म्हाडाची 5285 घरांची लॉटरी
दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या म्हणजेच म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा तसेच वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत एकूण 5,285 सदनिका, तसेच ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी, 14 जुलै सुरू झाली आहे.
कसे आहे वेळापत्रक?
कोकण विभाग लॉटरी 2025 चे वेळापत्रक
14 जुलैपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू.
13 ऑगस्ट : रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे.
14 ऑगस्ट : रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. त्यानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील.
21 ऑगस्ट : सायंकाळी 6 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल.
25 ऑगस्ट : सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रारूप यादीवर दावे व हरकती नोंदविता येणार आहेत.
1 सप्टेंबर : सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध होईल.
3 सप्टेंबर : सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे जाहीर केली जाईल.