मिरा–भाईंदरमध्ये भाजप नेते कृपाशंकर सिंग यांच्या विधानानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मिरा–भाईंदर महापालिकेत भाजपचेच जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील आणि महापौरही भाजपचाच असेल, तसेच मुंबईतही भाजपचाच महापौर होईल, असे विधान त्यांनी केले होते.
या विधानाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नविनिर्माण सेनेने (मनसे) मिरा–भाईंदरमध्ये बॅनर लावत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बॅनरवर “भूमिपुत्र व स्थानिकांना डावलणाऱ्या मोठ्या पक्षांच्या रावणाचे 16 तारखेला मिरा–भाईंदरमध्ये दहन करण्यात येईल” असा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहरात येऊन कोणत्याही नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे देऊ नयेत, असेही नमूद करण्यात आले आहे.
advertisement
मनसेचे मिरा–भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी भाजपवर मराठी आणि स्थानिक भूमिपुत्रांना डावलत असल्याचा आरोप केला. भाजपने 14 मराठी नगरसेवकांची तिकिटे कापली, यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते, असे ते म्हणाले. मिरा–भाईंदर आणि मुंबईचा महापौर मराठीच असावा, हीच मनसेची ठाम भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मराठी अस्मितेवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे.यामुळे या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
