मिरारोड पूर्व येथील शांती शॉपिंग सेंटर, C-78 मधील एका ऑफिसमध्ये बुधवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास एक अज्ञात इसम शिरला होता.त्याने ऑफिसमध्ये असलेल्या एका महिलेच्या गळ्यावर चाकूचा धाक दाखवत तिच्या जवळील 2 लाख 94 हजार रुपयांची रोख रक्कम लुटून पळून गेला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त व नयानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी यावेळी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तपास सूरू केला होता. या तपासा दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपी मुजम्मिल अब्दुल हाफीज सिद्दीकी (वय 20)याला रे रोड येथून गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले होते.
advertisement
यानंतर तपासादरम्यान या प्रकरणात धक्कादायक वळण समोर आले आहे.ज्या महिलेवर चाकूचा धाक दाखवून लूटमार केल्याचा दावा करण्यात आला होता, ती महिला स्वतःच या कटाची सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे चाकू दाखवणारा आरोपी हा तिचाच मित्र असल्याचे समोर आले असून संपूर्ण लूटमार ही पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी संबंधित महिलेसह एकूण 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात कलम 309(4),329(1)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान केंगार व नयानगर गुन्हे प्रकटीकरण पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
