परदेशामध्ये नोकरीचे आमिष दाखवत तरूणांना गंडा घालून त्यांना म्यानमारमध्ये सायबर गुन्हेगारीच्या कामामध्ये गुंतवलं जात होते. त्यांच्या हातात हे बेकायदेशीर काम दिले जात होते. नोकरीचे अमिष दाखवणाऱ्या भामट्याचं नाव, सुनील रामकृष्णन उर्फ क्रिश असे होते. क्रिशला मुंबईच्या सीबीआय ब्रँचने ताब्यामध्ये घेतलं आहे. थायलंडमध्ये नोकरी देण्याचे अमिष क्रिश दाखवायचा. गरजू तरुण त्याकडे नोकरीच्या अमिषाने आल्यानंतर त्यांना तो सर्वप्रथम दिल्लीमध्ये पाठवायचा. मग तो त्यानंतर त्यांना बँकॉक आणि नंतर म्यानमारमध्ये पाठवायचा. तिथे तो तरूणांना कॉल सेंटरमध्ये सायबर गुन्हेगारीच्या कामाला लावून द्यायचा.
advertisement
हे काम पाहून अनेक तरूण म्यानमार आणि त्यानंतर बँकॉक मार्गे पळून आले. त्यांनी भारतात येताच या संपूर्ण प्रकरणाची माहिती सीबीआयला दिली होती. या प्रकरणाच्या तपासाअंती भारतातून क्रिशची भूमिका महत्त्वाची असल्याची कळताच त्याला सीबीआयच्या अधिकार्यांनी मुंबईमधून अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण मुंबईमध्ये सुरू होते. सध्या सीबीआयच्या टीमकडून क्रिशने कोणकोणत्या परिसरातील तरूणांना परदेशात नोकरी देण्याचं अमिष देत फसवलं आहे, याचा सध्या पोलीस तपास करत आहेत. सीबीआयच्या टीमकडूनच या प्रकरणाची सखोल आणि सर्वच स्तरातून चौकशी केली जात आहे. याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
