नक्की घडलं काय?
मुंबईतील शिवडी परिसरात चालताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एका 20 वर्षीय तरुणावर तिघांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात काशिफ राजदर शेख हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, काशिफ गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास बीपीटी रोडवरील पब्लिक टॉयलेटजवळून, ईस्टर्न फ्रीवेच्या खालील मार्गाने जात होता. यावेळी चालताना त्याचा अनिल विनोद उपाध्याय याला धक्का लागला. या छोट्याशा कारणावरून अनिल उपाध्याय आणि त्याचे मित्र रहिम जरार शेख आणि अजीत रहिम शेख यांनी काशिफसोबत वाद घातला.
वाद वाढल्यानंतर तिघांनी काशिफला शिवीगाळ करत त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी लाकडी दांडा आणि काही हत्यारांचा वापर करून त्याला बेदम मारहाण केली. या हल्ल्यात काशिफच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या.
जखमी अवस्थेत असतानाच काशिफने मोबाईलवरून आपल्या वडिलांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्याचे वडील तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि काशिफला उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
या घटनेनंतर काशिफच्या वडिलांनी शिवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अनिल विनोद उपाध्याय, रहिम जरार शेख आणि अजीत रहिम शेख या तिन्ही आरोपींना अटक केली. अटकेनंतर त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास शिवडी पोलीस करत आहेत.
