कमाल आर खान याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ओशिवारा येथील नालंदा इमारतीमध्ये हा गोळीबार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका मॉडेल आणि लेखकाच्या घराच्या दिशेने अज्ञात इसमाने गोळी झाडली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, मात्र भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत होते.
advertisement
पोलिसांनी या संपूर्ण घटनेमागे फिल्म इंडस्ट्रीचा अँगल असल्याचं म्हटलं आहे. प्राथमिक तपासात काही महत्त्वाचे दुवे हाती लागल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा कमाल आर खानकडे वळवला. काल रात्री उशिरा पोलिसांनी केआरकेला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या गोळीबाराचा मास्टरमाइंड नेमका कोण आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
हा गोळीबार नेमका कोणत्या कारणास्तव करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. व्यावसायिक शत्रुत्व की वैयक्तिक वाद, अशा सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत. केआरकेचे नाव यापूर्वीही अनेक वादांत अडकले असल्याने या अटकेमुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. तपासाअंती यातील खरं कारण लवकरच स्पष्ट होईल. कमाल आर खानला ताब्यात घेतल्यामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पोलीस लवकरच या प्रकरणाचा अधिकृत खुलासा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलाची साफसफाई केल्यानंतर ती चालू आहे का हे तपासण्यासाठी केआरके यांनी गोळीबार केला. खानने सांगितले की, घराशेजारील खरफुटी परिसराच्या दिशेने गोळ्या झाडल्या, कारण तिथे मोकळी जागा आहे आणि कुणालाही धोका निर्माण होणार नाही. मात्र, वार्यामुळे गोळ्यांची दिशा बदलली आणि त्या ओशिवरा येथील निवासी इमारतीवर जाऊन लागल्या.कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता, असा दावा केआरके यांनी केला आहे.
