मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये रेल्वेच्या डब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रेल्वे कारशेडमध्ये नव्या कोऱ्या रेल्वे डब्याला अचानक आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण डब्बा आगीच्या भक्षस्थानी सापडला. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या रेल्वे डब्ब्याला आग लागली. एलएचबी (LHB) स्लीपर कोच असणार हा डब्बा होता. अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला.
advertisement
आगीमध्ये हा कोच ७० टक्के वरचा भाग जळाला होता. सीएसएमटी (CSMT) बाजूच्या शौचालयात वेल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंगच्या ठिणगीमुळे जवळच्या वस्तूंना आग लागली. जोरदार वाऱ्यामुळे आणि कोच नॉन-एसी असल्यामुळे आग वेगानं पसरली. बघता बघता आगीने रौद्ररूपधारण केलं आणि संपूर्ण डब्बा हा आगीच्या भक्षस्थानी सापडला.
रेल्वे कारशेडमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोच तात्काळ मोकळ्या जागेत बाहेर ढकलण्यात आल्याने इतर कोणत्याही कोचचे किंवा वर्कशॉपच्या पायाभूत सुविधांचे नुकसान झाले नाही. तातडीने अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. त्यानंतर सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
