मुंबई-पुणे महामार्गावरून सध्या दररोज 65,000 वाहने प्रवास करतात. तर वीकेंडला शनिवार आणि रविवारी हा आकडा 1 लाखांच्या वर जातो. वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने या एक्स्प्रेस वेच्या विस्ताराची योजना आखली होती. हा द्रुतगती महामार्ग 8 लेनचा करण्यात येणार होता. परंतु, आता यामध्ये बदल करून 10-लेनचा सुपर हायवे बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
14,260 कोटींचा खर्च
मुंबई-पुणे सुपर हायवे 10-लेनचा होणार असल्याने प्रकल्पाच्या खर्चात 1420 कोटींची वाढ झालीये. एकूण बांधकाम खर्च 8,440 कोटी रुपये असून प्रकल्पाचा अंदाजित खर्च 14,260 कोटी आहे. हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलअंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यात सरकार 40 टक्के निधी उपलब्ध करून देईल. तर उर्वरित 60 टक्के निधी खासगी वितरकांकडून उभारण्यात येईल. या महामार्गाच्या विस्ताराचे काम 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता असून 2029-30 पर्यंत हा सुपर हायवे पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, सध्याचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे हा 94.6 किमी लांबीचा असून हा महामार्ग नवी मुंबईतील कळंबोलीपासून पुण्याजवळील किवळेपर्यंत आहे. 2002 साली सुरू झालेल्या या महामार्गावर प्रवासी वाहनांची संख्या वाढत आहे. सध्या एक्स्प्रेस वेच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम सुरू असून यात खंडाळा घाटातील 10-लेनच्या कामाचा देखील समावेश आहे. नवीन विस्ताराची योजना ही उर्वरित भागासाठी असेल.
