नव्या एक्स्प्रेसवेमुळे प्रवास होणार वेगवान
सध्या गुजरात आणि उत्तर भारतातून येणारी हजारो मालवाहू वाहने दररोज जेएनपीए येथे येतात. ही वाहने प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, घोडबंदर रोड, ठाणे-बेलापूर किंवा मुंब्रा-तळोजा मार्गांचा वापर करतात. त्यामुळे पालघर, वसई, विरार, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात कायम वाहतूक कोंडी पाहायला मिळते.
नवा एक्स्प्रेसवे कसा असेल?
advertisement
ही समस्या दूर करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्णपणे नव्या आठ पदरी बडोदा-मुंबई द्रुतगती महामार्गाची उभारणी सुरू केली आहे. हा महामार्ग महाराष्ट्रात तलासरीपासून मोरबे म्हणजेच बदलापूरजवळ पर्यंत एकूण 156 किमी लांबीचा असेल.
या महामार्गाचा पहिला टप्पा तलासरी ते शिरसाड दरम्यान 79.8 किमीचा आहे. यातील तलासरी ते गंजाड हा भाग पूर्ण झाला असून उर्वरित काम फेब्रुवारी-मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा शिरसाड ते मोरबे असा 76.88 किमीचा असून तो एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होईल.
या महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची थेट जोड मिळणार आहे. भिवंडी जवळील आमने येथे दोन्ही महामार्गांमध्ये इंटरचेंज असणार आहेत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि जेएनपीए बंदराकडे जाणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहेत.
