नेमकं काय घडलं?
गोरेगाव पश्चिमेतील हरिरतन सोसायटीमध्ये 30 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी नंदिनी अय्यर (वय 34) यांनी बांगूर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नंदिनी अय्यर यांनी मंगळवारी सकाळी 7.30 वाजता मोबाइल अॅपच्या माध्यमातून गौरी उपाध्याय नावाच्या महिलेला घरकामासाठी बोलावले होते. संबंधित महिला सकाळी साडे अकरा ते दुपारी 1 या वेळेत घर साफसफाईसाठी आली होती. घरकाम सुरू करण्यापूर्वी नंदिनी यांनी आपल्या हातातील दोन सोन्या-हिऱ्याच्या अंगठ्या बाथरूमबाहेरील बेसिंगवर काढून ठेवल्या होत्या.
advertisement
घरातील काम पूर्ण करून दुपारी 1 वाजता कामवाली महिला निघून गेल्यानंतर नंदिनी यांनी बेसिंगवर ठेवलेल्या अंगठ्या शोधल्या. मात्र त्या दोन्ही अंगठ्या तेथे आढळून आल्या नाहीत. त्यामुळे कामासाठी आलेल्या महिलेनेच अंगठ्या चोरल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या घटनेनंतर नंदिनी यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित महिलेचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अॅपद्वारे नोकर किंवा कामवाली नेमताना त्यांची ओळख, कागदपत्रे आणि पार्श्वभूमी तपासल्याशिवाय नियुक्ती करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे
