लोअर परळ की स्लोअर परळ?
या अहवालात कागदावर सुधारणा दिसत असली तरी, दक्षिण मुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या लोअर परळ सारख्या भागात प्रवाशांना ही "सुधारणा" म्हणजे क्रूर थट्टा वाटते. ऑफिस सुटण्याच्या वेळी लोअर परळ, अंधेरी आणि बीकेसी (BKC) मधून बाहेर पडताना ताशी वेग केवळ १६.९ किमी इतकाच मर्यादित राहिला आहे. कोस्टल रोड आणि मेट्रोच्या विस्तारामुळे काही भागात दिलासा मिळाला असला, तरी लोअर परळच्या अरुंद गल्ल्या आणि वाढत्या गाड्यांमुळे हे भाग आजही 'स्लोअर'च राहिले आहेत.
advertisement
पाच दिवसांचा जीवघेणा हिशोब
अहवालातील आकडेवारीनुसार, मुंबईकरांनी वर्षातील १२६ तास केवळ क्लच आणि ब्रेक दाबण्यात घालवले. संध्याकाळी ऑफिसवरून घरी परतताना १० किमीचे अंतर कापायला सरासरी ३५ मिनिटे ३० सेकंद लागतात. विशेष म्हणजे, १६ सप्टेंबर २०२५ हा दिवस मुंबईसाठी वर्षातील सर्वात भयानक दिवस ठरला; ज्या दिवशी रस्त्यांवर १२९% अतिरिक्त गर्दी नोंदवण्यात आली.
बेंगळुरू आणि पुण्यापेक्षा आपण 'बरं' आहोत का?
मुंबई जागतिक ट्रॅफिकच्या क्रमवारीत १८ व्या क्रमांकावरून थोडी खाली सरकली आहे, याचा अर्थ सुधारणा होत आहे. या शर्यतीत आपण एकटे नाही; बेंगळुरूमध्ये १० किमीसाठी आजही ३६ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो, तर पुणे देखील ट्रॅफिकच्या विळख्यात मुंबईला टक्कर देत आहे.
सुधारणा की भ्रम?
मेट्रोचे जाळे विस्तारत असले तरी जोपर्यंत मुंबईचा सरासरी वेग २०-२५ किमीच्या वर जात नाही, तोपर्यंत मुंबईकरांचे हे '५ दिवस' वाचणे कठीण आहे. प्रशासनाच्या नजरेत ट्रॅफिक सुटत आहे, पण लोअर परळच्या फ्लायओव्हरवर अडकलेल्या मुंबईकरासाठी 'वेग' आजही एक स्वप्नच आहे.
