संभाजीनगर-मुंबई प्रवासाचा कायापालट
मनमाड ते कसारा दरम्यान तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन टाकण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तब्बल 10,154 कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे. सुमारे 135 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचे काम पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर कसारा घाटातील चढ-उताराचा ताण कमी होणार असून गाड्यांना अतिरिक्त इंजिन (बँकर) लावण्याची गरज भासणार नाही.
advertisement
साडेतीन तासांचा प्रवास आता किती कमी होणार का?
सध्या नाशिक ते मुंबई प्रवासासाठी साडेतीन ते चार तास लागतात. नवीन लाईनमुळे 25 ते 30 मिनिटांची बचत होईल आणि नाशिकहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत अवघ्या तीन तासांत पोहोचणे शक्य होईल. दररोज अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक-मुंबई लोकलची शक्यता अधिक मजबूत होणार आहे.
उत्तर भारतातून येणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा
या मार्गामुळे नांदेड, छत्रपती संभाजीनगर तसेच उत्तर भारतातून भुसावळमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांनाही मोठा फायदा होईल. इगतपुरी आणि कसारा येथे बँकर लावण्यासाठी लागणारा वेळ वाचेल त्यामुळे मालवाहतुकीलाही गती मिळेल. मुंबई ते हावडा दरम्यान मध्य रेल्वेची क्षमता चारपट वाढण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पात 131 किमी नवीन रेल्वेमार्ग, 218 लहान पूल, 16महत्त्वाचे पूल, 5 अवघड पूल, 5 ओव्हरब्रिज, 21 अंडरपास आणि एकूण 28 किमी लांबीचे 5 बोगदे बांधले जाणार आहेत. दौंड-मनमाड आणि संभाजीनगर-मनमाड दुहेरीकरणामुळे मनमाड जंक्शनचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
