येत्या वर्षात मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारणार
2026 मध्ये मेट्रो 2 ब, मेट्रो 4, मेट्रो 4 अ आणि मेट्रो 9 या मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या मार्गिकांमुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन लोकांना सार्वजनिक वाहतुकीचा चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.
कशा असतील या मेट्रो मार्गिका?
मेट्रो 2 ब ही मार्गिका अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द दरम्यान असणार आहे. ही सुमारे 23 किलोमीटर लांबीची मार्गिका असून यामध्ये एकूण 22 मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत पूर्ण केले जाणार असून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
advertisement
ठाणेकरांनाही मिळणार मेट्रोचा प्रवास
मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ या मार्गिका वडाळा ते ठाणे, कासारवडवली आणि गायमुखपर्यंत धावणार आहेत. ठाणे आणि पूर्व उपनगरांतील प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्राची प्रक्रिया फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू होणार असून मार्चपर्यंत हा टप्पा प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच मेट्रो 9 ही दहिसर ते भाईंदर दरम्यान धावणार आहे. सध्या या मार्गिकेसाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच ती सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
2025 मध्ये या मार्गिकांची कामे पूर्ण होणार होती मात्र काही अडथळ्यांमुळे ती रखडली. आता 2026 मध्ये या सर्व मेट्रो मार्गिका सुरू होतील, अशी आशा मुंबईकर व्यक्त करत आहेत. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
