मुंबईसह उपनगरांतील अनेक नागरिक नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील प्रमुख देव दर्शनासाठी जात असतात. सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणूनच नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि पहिल्या दिवशी मंदिरांमध्ये होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता सर्वच मंदिर प्रशासनाने व्यवस्थित नियोजन केले आहे. मुंबईतील प्रत्येक मंदिरांमध्ये भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, गर्दी लक्षात घेता व्यवस्थापन करण्यात आले.
advertisement
सिद्धिविनायक मंदिराकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता व्यवस्थापन करण्यात आले आहे, तर 6 जानेवारी रोजीच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधतही भाविकांसाठीच्या सेवा- सुविधांचे नियोजन केले आहे. आशीर्वचन पूजा रांग, गाभार्यातून दर्शनासाठी सर्वसामान्य, तसेच महिलांची विशेष रांग, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती स्त्रिया व नवजात बालके यांच्यासाठीची रांग आणि मुख दर्शनाची रांग, असे रांगेचे नियोजन केले आहे.
महालक्ष्मी मंदिराचे वरिष्ठ व्यवस्थापक नितीन कांबळी यांनी सांगितले की, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दर्शनासाठी दाखल होणार्या भाविकांच्या सेवासाठी आवश्यक सेवा- सुविधा दिल्या जातील. सुरक्षारक्षक नेमण्यासह रुग्णवाहिका, पोलिस बंदोबस्त आणि उर्वरित सेवा-सुविधांचा यामध्ये समावेश आहे. दर्शनासाठी दाखल होणार्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे मंदिर व्यवस्थापनाने सांगितले आहे.
सिद्धिविनायक मंदिरात दर्शन आणि आरतीची वेळा
- दर्शन- पहाटे 03:15 ते 05:15
- आरती- पहाटे 05:30 ते 6
- दर्शन- सकाळी 6 ते दुपारी 12
- नैवैद्य- दुपारी 12 ते 12:30
- दर्शन- 12:30 ते सायंकाळी 7
- धूपारती- सायंकाळी 7 ते 07:10
- आरती - सायंकाळी 07:30 ते रात्री 8
- दर्शन- 8 ते रात्री 11:30
