पोटच्या लेकीला उघड्यावर सोडून पालक फरार
पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर कर्तव्यावर असलेल्या एका होमगार्डला अचानक एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता अंदाजे 3 ते 4 वर्षांची लहान मुलगी एकटीच रडत उभी असल्याचे दिसून आले. तिच्या अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ब्राऊन रंगाची फुल नाईट पॅन्ट होती. आजूबाजूला तिच्यासोबत कोणीही पालक किंवा नातेवाईक दिसत नव्हते.
advertisement
होमगार्डने लगेच परिसरात चौकशी करत मुलीच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ शोध घेऊनही कोणीही पुढे आले नाही. मुलीची विचारपूस केली असता तिने फक्त आपले नाव शिवानी असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधित होमगार्डने तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
रेल्वे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा यामध्ये मुलीच्या पालकाने तिला पूर्णपणे टाकून देत तेथून निघून गेल्याचे स्पष्टपणे दिसून आले. या प्रकरणी पनवेल रेल्वे पोलिसांनी संबंधित पालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
