भाजपाने अन्य पक्षातून आलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिल्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. हाच असंतोष दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी वसई दौऱ्यावर आले होते.माणिकपूर येथील वायएमसीए सभागृहात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले होते. विशेष म्हणजे नाराज कार्यकर्ते गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मात्र संध्याकाळी सभा आटोपल्यानंतर रवींद्र चव्हाण सभागृहाबाहेर पडताच जुचंद्र येथील भाजप कार्यकर्ते निशिकांत म्हात्रे यांनी त्यांना अडवून आपली नाराजी व्यक्त केली.
advertisement
'चाळमाफिया आणि पक्षात नव्याने आलेल्या लोकांना तिकीट विकले गेले आहे,' असा गंभीर आरोप करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.अचानक झालेल्या या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी पोलिसांनी हस्तक्षेप करत निशिकांत म्हात्रे यांना बाजूला केले व गोंधळ शांत केला. या घटनेमुळे वसई भाजपातील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली होती.
माझ्या आयु्ष्यात मी बर्बाद झालो, का तुम्ही आम्हाला फसवलं असा सवाल निशिकांत म्हात्रे यांना अडवणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांना केला. मागची 45 वर्ष म्हणजे 1980 पासून आम्ही काम करतो आहे,पण काल आलेल्यांना तुम्ही तिकीटं दिली.जेव्हा झेंडा खांद्यावर घेण्याची कुणाची हिम्मत नव्हती त्यावेळी आम्ही झेंडा खांद्यावर घेतला होता.आणि आज आमची ही परिस्थिती आहे,अशी नाराजी निशिकांत म्हात्रे यांनी व्यक्ती केली.
आम्हाला जो आमदार मिळाला तो सावत्र आमदार मिळाला.म्हणून आमची ही परिस्थिती झाली.आम्हाला स्नेहा दुबे आमदार मिळाल्यामुळे आमचे आयु्ष्य उद्ध्वस्त झालं असेद देखील निशिकांत म्हात्रे म्हणाले आहेत. ज्येष्ठांची काय किंमत नाही आहे, जे सात महिन्यापुर्वी आले त्यांना तिकीट दिली आणि चाळमाफियांना तिकीट दिली, असा आरोप निशिकांत म्हात्रे यांनी केला आहे.
