विले पार्लेमध्ये राहणाऱ्या एका ८२ वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाला सायबर भामट्यांनी हा गंडा घातला आहे. दूरसंचार विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि दिल्ली पोलीस दलातील अधिकारी असल्याचे भासवून हा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विलेपार्ले येथील तक्रारदार वृद्धाला ३० सप्टेंबर २०२५ रोजी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण दिल्लीतील दूरसंचार विभागाचा अधिकारी 'पवन कुमार' असल्याचं सांगितलं. त्याने वृद्धाच्या आधार कार्डचा गैरवापर करून बनावट बँक खाते उघडल्याचा आणि त्याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला. यामुळे वृद्ध घाबरले.
advertisement
यानंतर त्यांना 'खुशी शर्मा' (दिल्ली पोलीस उपनिरीक्षक) आणि 'हेमराज कोहली' (सीबीआय अधिकारी) अशी ओळख सांगणाऱ्या व्यक्तींकडून पुन्हा व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल आले. त्यांच्याविरोधात नवी दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे सांगत, आधार क्रमांक अवैध आर्थिक व्यवहारांशी जोडल्याचे धमकावून त्यांना अटकेची भीती दाखवण्यात आली. या भीतीपोटी वृद्धाकडून सायबर भामट्यांनी टप्प्याटप्प्याने 21 दिवसांत 1 कोटी 8 लाख रुपये उकळले. या मोठ्या फसवणुकीमुळे एकच खळबळ उडाली आहे.