मुंबई- अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन ते अडीच तासांत पार करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) कडून 508 किलोमीटर लांबीचा बुलेट ट्रेन प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पातील पहिले स्थानक बीकेसी येथे उभारले जात असून सध्या तेथे मोठ्या प्रमाणावर खोदकाम सुरू आहे. मात्र या कामादरम्यान धूळ नियंत्रण, पाण्याचा शिडकावा, झाकणांची व्यवस्था अशा वायू प्रदूषण नियंत्रण उपायांची अंमलबजावणी होत नसल्याचे पालिकेच्या तपासणीत आढळून आले. यापूर्वी पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावून आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे आदेश दिले होते. तरीही नियमांचे पालन न झाल्याने प्रकरण न्यायालयात गेले.
advertisement
उच्च न्यायालयाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत पालिकेला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवारी पालिकेच्या पथकाने बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामाची तसेच वांद्र्यातील उच्च न्यायालय संकुलाच्या पाडकामाची पाहणी केली. दरम्यान, अंधेरी पश्चिम ते मंडाले, मानखुर्द मेट्रो 2B मार्गिका आणि वांद्र्यातील उच्च न्यायालयाच्या पाडकामातही प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन्ही प्रकल्पांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून संबंधित यंत्रणांनी लवकरच आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सध्या या कामांवर बंदी घालण्यात आलेली नसली तरी ठरलेल्या वेळेत सुधारणा न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
