मुंबईतल्या जुहूमध्ये हा प्रकार घडला आहे. लॉजिस्टिक्स आणि मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या महिलेने लग्नाच्या उद्देशाने एका डेटिंग ॲपवर प्रोफाइल तयार केली होती. तिथे तक्रारदार व्यावसायिकाची जुहूमध्ये राहत असलेल्या प्रियांका गुप्ता नावाच्या महिलेशी झाली. प्रियंका गुप्ताने अतिशय चलाखीने व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला आणि त्याला आर्थिक जाळ्यात ओढले. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत असून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, महिलेने व्यावसायिकाला सांगितले की, ती तिच्या पतीपासून वेगळी राहत असून तिला 6 वर्षांची एक मुलगी सुद्धा आहे, असं देखील त्या महिलेने व्यावसायिकाला सांगितले. तिला नोकरदार व्यक्तीसोबत नाही तर एका व्यावसायिकाशी लग्न करायचे आहे. शिवाय, तिने तिचं पहिलं लग्न झाल्याचेही सांगितले. हळूहळू त्यांच्या संवादाचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यांनी व्हॉट्सॲपवर बोलण्यास सुरुवात केली. एकमेकांवर विश्वास वाढल्यानंतर त्यांनी भविष्यात लग्न करण्याचा निर्णय देखील घेतला होता.
दरम्यान, 13 ऑक्टोबरपासून या महिलेने व्यावसायिकासोबत चालाखीने गेम खेळायला सुरूवात केली. तिने त्या व्यावसायिकाला सांगितले की, मी मार्केट ॲक्सेस कंपनी (Market Access Company) नावाच्या फर्मद्वारे सोन्याचा व्यापार करते आणि त्याने त्यात गुंतवणूक करावी कारण त्यातून चांगला परतावा मिळतो. असं सांगू तिने व्यावसायिकाला देखील त्यात पैसे गुंतवण्यास सांगितले. आपल्या होणाऱ्या पत्नीवर डोळे झाकून विश्वास ठेवून व्यावसायिकाने या योजनेत गुंतवणूक करण्यास होकार दिला. त्यानंतर संबंधित महिलेने त्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर व्यावसायिकाचे एक बनावट खाते तयार करून दिले.
व्यावसायिकाने विश्वासाने त्या खात्यावर वेळोवेळी एकूण 53.30 लाख रुपये जमा केले. काही दिवसांनंतर त्याला त्याच्या ह्या ऑनलाइन खात्यावर ही रक्कम वाढून 1.08 कोटी रुपये झाल्याचे दिसू लागले. आपली रक्कम दुप्पट झाल्याचे पाहून व्यावसायिकाला आनंद झाला. मात्र, जेव्हा त्याने यातील काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला काही तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. त्याने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत संपर्क साधला असता, त्यांनी रक्कम काढण्यापूर्वी एकूण रकमेच्या 30 टक्के रक्कम टॅक्स किंवा फी म्हणून जमा करण्यास सांगितले. व्यावसायिकाकडे टॅक्स किंवा फी भरण्यासाठी पुरेशी रक्कम नव्हती, त्यामुळे त्याने आपली मूळ गुंतवणूक केलेली रक्कम तरी परत मिळावी अशी विनंती केली.
परंतु, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यावसायिकाला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आहे. सायबर पोलीस आता या प्रकरणाचा तांत्रिक तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
