एअर इंडिया समूहाने जाहीर केलं आहं की, ते नवी मुंबई विमानतळ सुरू होताच तिथून थेट व्यावसायिक उड्डाणं सुरू करणार आहेत. हे विमानतळ अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडद्वारे चालवलं जात आहे. अजून हे विमानतळ सुरु झालेलं नाही. त्याचं काम अजूनही सुरु आहे.
अशात अनेकांना असा प्रश्न पडला आहे की जेव्हा हे विमानतळ सुरु होईल तेव्हा इथून पहिलं कोणतं विमान उड्डाण करेल आणि कुठून ते कुठपर्यंत त्याचा प्रवास असणार आहे? चला या विमानतळाबद्दल थोडी माहिती घेऊ.
advertisement
या विमानतळावरुन एअर इंडियाची पहिली फ्लाइट उडणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात एअर इंडिया एक्सप्रेस दररोज 20 उड्डाणं करणार आहे, ज्यातून भारतातील 15 शहरे जोडली जातील. त्यानंतर 2026 च्या मध्यापर्यंत ही संख्या वाढवून दररोज 55 उड्डाणं करण्याचा आणि त्यात 5 आंतरराष्ट्रीय उड्डाणं समाविष्ट करण्याचा विचार आहे. तर 2026 च्या हिवाळ्यापर्यंत दररोज 60 उड्डाणं करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितलं की, नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबई शहर एकापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या मोजक्याच शहरांपैकी एक असेल. हे विमानतळ फक्त भारताशीच नव्हे तर परदेशाशीही थेट जोडणारा दुवा ठरेल.
अदानी एअरपोर्टचे सीईओ अरुण बन्सल यांनीही एअर इंडियाच्या या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांनी सांगितलं की, यामुळे मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवा आकार मिळेल आणि प्रवाशांना उत्तम अनुभव देता येईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाच टप्प्यात बांधला जात आहे. पहिल्या टप्प्यात दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.5 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता असेल. संपूर्ण विमानतळ पूर्ण झाल्यावर ही क्षमता आणखी मोठी होईल.
एकूणच, नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळणार असून मुंबईतील विमानतळावरील ताणही कमी होणार आहे.