दिल्लीतल्या जंगपुरा भागात राहणाऱ्या एका वृद्ध डॉक्टरची काही दिवसांपूर्वी राहत्या घरात निर्दयपणे हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी त्यांचा खूप छळ करण्यात आल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय. घराजवळच्या सीसीटीव्ही फूटेजमधून पोलिसांना या घटनेबाबत बरीच माहिती मिळाली आहे. त्या वृद्ध डॉक्टरचा गळा पट्ट्यानं आवळण्यात आला व त्याआधी त्यांच्या डोक्यावर एखादी वस्तू मारण्यात आली होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
advertisement
आग्नेय दिल्लीच्या जंगपुरा भागात राहणारे योगेश चंद्र पॉल (63) हे शुक्रवारी (10 मे) राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांचे हात-पाय बांधलेले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घराच्या जवळचं सीसीटीव्ही फूटेज तपासलं. तेव्हा त्यात चार संशयित घराजवळ दिसले. त्यापैकी एक जण बाहेर उभा राहिला व इतर तीन जण घरात गेले. आरोपींनी पॉल यांना मारहाण केली, खुर्चीला बांधून ठेवलं व त्यांचं तोंडही बंद केलं.
पॉल यांना खुर्चीला बांधून त्यांना ते स्वयंपाकघरात घेऊन गेले. तिथे त्यांच्या डोक्यावर एका वस्तूनं वार केला. पॉल यांच्या दोन्ही कुत्र्यांना आरोपींनी बाथरूममध्ये बंद करून ठेवलं आणि कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्यानं पॉल यांचा गळा आवळला. घरातून बाहेर पडण्याआधी आरोपींनी घरातल्या सामानाची तोडफोड केली. या घटनेबाबत पोलिसांनी हत्या आणि दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे.
वाचा - मुलाला ड्रग्ज देऊन नशेत असताना करून घ्यायची हे धक्कादायक काम, मुंबईतील आईचं कांड
डॉक्टर पॉल त्यांची पत्नी नीना पॉल यांच्यासह जंगपुरा भागातील घरी राहत होते. नीना पॉल या दिल्लीतल्या एका सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहेत. नवऱ्याची हत्या झाली, तेव्हा त्या रुग्णालयातच होत्या. त्या दोघांना दोन मुली असून एक मुलगी नोएडा, तर दुसरी कॅनडाला राहते. दोन्ही मुलींची लग्नं झाली आहेत. या घटनेबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
सध्याच्या काळात मुलं परदेशी शिक्षण व नोकरीसाठी गेल्यानं अनेक वृद्ध घरी एकटे असतात. अशा एकट्या व वृद्ध नागरिकांवरचे हल्ले वाढत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांनी स्वसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली पाहिजे.