पायलटची चूक असं म्हणून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला खरा, पण आता अमेरिकेतून समोर आलेल्या एका धडकी भरवणाऱ्या रिपोर्टने या अपघाताचं दुःख पुन्हा ताजं केलं आहे. ज्या विमानाने 11 वर्ष हजारो प्रवाशांना आकाशाची सफर घडवली, ते विमान पहिल्या दिवसापासूनच 'आजारी' होतं, असा खळबळजनक खुलासा झाला आहे. मग प्रश्न उरतोच की, त्या निष्पाप पायलटचा काय दोष?
advertisement
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या बोइंग 787 विमान अपघातात आता एक नवीन आणि धक्कादायक खुलासा झाला. या अपघातासाठी वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल यांनी फ्यूल कंट्रोल स्विच चुकीच्या पद्धतीने बंद केल्याचा दावा याआधी करण्यात आला होता. मात्र, अमेरिकेतील फाउंडेशन फॉर एविएशन सेफ्टी या संस्थेने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला. एफएएस'ने अमेरिकन सिनेटसमोर सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, बोइंग 737 मॅक्स अपघातांप्रमाणेच याही वेळी तांत्रिक त्रुटी लपवण्यासाठी पायलटला दोषी ठरवलं जात आहे.
एअर इंडियाचे हे विमान ज्या दिवशी भारतात आले, म्हणजेच 1 फेब्रुवारी २०१४ पासूनच त्यात गंभीर तांत्रिक समस्या होत्या, असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. या विमानाच्या सेवाकाळातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमानातील इलेक्ट्रोकॉक आणि सॉफ्टवेअरमध्ये दोष असणे, वारंवार सर्किट ब्रेकर ट्रिप होणे आणि वायरिंग डॅमेज होण्याच्या तक्रारी सतत होत्या. जानेवारी २०२२ मध्ये या विमानाच्या प्रायमरी पावर पॅनलमध्ये आग लागली होती, ज्यामुळे वायरिंगचे प्रचंड नुकसान झालं होतं.
अशाच प्रकारच्या इलेक्ट्रिकल तक्रारी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील बोइंग ७८७ विमानांमध्येही दिसून आल्या आहेत. संस्थेने सुमारे २,००० पेक्षा जास्त 'सिस्टम फेल्युअर' रिपोर्टचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. या गंभीर आरोपांनंतर बोइंग कंपनीने सावध पवित्रा घेतला आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ते केवळ भारताच्या 'एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो' (AAIB) च्या अधिकृत तपासावरच विश्वास ठेवतील. या धक्कादायक अहवालामुळे आता विमान प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि बड्या कंपन्यांच्या उत्तरदायित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जर तांत्रिक बिघाड पहिल्या दिवसापासून होता, तर इतकी वर्षे हे विमान प्रवाशांच्या जीवाशी का खेळलं जात होतं असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.
