दिल्ली विधानसभेवर २७ वर्षांनंतर भाजपचा झेंडा फडकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सूक्ष्म नियोजनाने दिल्लीत भाजपला विजय मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ५० हजारांच्या आतपास बैठका घेतल्याचे सांगितले जाते. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांपैकी भाजपने जवळपास ४९ जागा जिंकल्या आहेत तर आम आदमी पक्षाला केवळ २३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाने सहापट अधिक यश मिळवले आहे.
advertisement
निकालावर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया
निवडणूक निकालानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपचे अभिनंदन केले आहे. गेले १० वर्ष आम्ही दिल्लीतील जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यासाठी काम केले. परंतु या निवडणुकीत जनतेने भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या देण्याचे ठरविले. जनादेश मान्य करून आम्ही प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका निभावू, अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिली आहे. निकालानंतर केजरीवाल यांचा चेहरा पूर्णपणे उतरला होता, आवाजही खोल गेला होता. त्यांच्या देहबोलीतून त्यांच्या मनात असंख्य प्रश्नांचा काहूर माजल्याचे स्पष्टपणे दिसत होते.
दिल्लीच्या जनतेने भाजपला बहुमत दिले, त्याबद्दल भाजपचे अभिनंदन. भाजपने लोकांच्या इच्छा आकांक्षांसाठी काम करावे. दिल्लीच्या लोकांनी आम्हाला १० वर्ष बहुमत दिले. आम्ही आरोग्य, शिक्षण, वीज यावर आम्ही प्रभावी काम केले. दिल्लीच्या इन्फ्रास्ट्रक्चरवरही आम्ही काम केले. परंतु यावेळी आम्हाला जनतेने विरोधकांची भूमिका सांभाळण्यास सांगितले आहे. आम्ही केवळ विरोधी पक्षांची भूमिका निभावणार नाही तर आम्ही लोकांच्या सुख दु:खात सहभागी होऊ. आम्ही केवळ सत्तेसाठी राजकारणात आलो नाही तर आम्ही सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करण्यासाठी, त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी राजकारणात आलो, असे केजरीवाल म्हणाले.
आपच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे निवडणूक लढली. यादरम्यान तुम्हाला खूप काही सोसावे लागले, तरीही तुम्ही मागे हटला नाहीत. भाजपला विजयासाठी शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया निकालानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिली.