पश्चिम चम्पारण, 2 ऑगस्ट : समाजात प्रेमविवाहाबाबत आता बऱ्यापैकी परिवर्तन झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र विविध ठिकाणी आजही प्रेमविवाहाला मान्यता नाही. आधी शिक्षण मग लग्न असं अनेक पालकांचं मत असतं. तरीही काही तरुणमंडळी कुटुंबीयांचा होकार मिळेपर्यंत वाट पाहत नाहीत. तर, पळून जाण्याचा मार्ग स्वीकारतात. सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एक तरुणी तिच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची मागणी करतेय. तिचं म्हणणं आहे की, तिने स्वतःच्या मर्जीने पळून लग्न केलंय.
advertisement
तिने म्हटलंय, 'मी माझ्या मर्जीने पळून जाऊन लग्न केलं आहे. मला कोणीही असं करायला भाग पाडलेलं नाही किंवा जबरदस्तीही केलेली नाही. माझ्या नवऱ्याचा यात काही दोष नाही. जर कोणीही माझ्या नवऱ्याला किंवा सासरच्यांना मारण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांना कोर्टात खेचेन मग भलेही ते माझे आई-वडील असले तरीही.' खुशी कुमारी असं या तरुणीचं नाव असून तिचं वय जवळपास 19 वर्ष आहे, असं तिने या व्हिडिओमध्ये सांगितलंय.
ही तरुणी बिहारच्या पश्चिम चम्पारण जिल्ह्यातील दरवलिया मिश्रौली गावची रहिवासी आहे. व्हिडिओनुसार, ती 26 जुलै रोजी 1 वाजताच्या सुमारास घरातून पळाली आणि योगापट्टी भागातून बेतियात आली. इथे आल्यावर तिने प्रियकराशी संपर्क साधला आणि मला इथून घेऊन जा, असं त्याला सांगितलं. त्याने यासाठी नकार दिल्यावर तिने गाडीखाली जाऊन आत्महत्या करेन, अशी धमकीच त्याला दिली. त्यानंतर प्रियकर त्याठिकाणी आला आणि तिला घेऊन गेला. त्याने तिला खूप समजावलं, मात्र ती तिच्या म्हणण्यावर ठाम होती. अखेर दोघांनी लग्न केलं.
Shocking News : पाणी पिणं महिलेसाठी ठरलं जीवघेणं, घडलं असं की झाली भयानक अवस्था
खुशीने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'माझ्या सासरच्या लोकांना जिवेमारण्याच्या धमक्या मिळत आहेत. माझ्या नवऱ्याविरोधात पोलिसांत जाण्याची धमकी माझे वडील देत आहेत. मी बेतिया जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना विनंती करते की, माझ्या माहेरच्यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या कोणत्याही तक्रारीबाबत कारवाई करू नये. मी माझ्या मर्जीने लग्न केलं आहे. यात माझ्या नवऱ्याचा काही दोष नाही. मी जिथे कुठे आहे तिथे आनंदात आहे आणि मी खूप हट्टी आहे. कोणीही आमच्याविरोधात काही पाऊल उचललं, तर कोर्टात खेचेन', अशी धमकीच तिने दिली आहे.
दरम्यान, व्हिडिओमध्ये या तरुणीच्या नाकापासून पूर्ण भांगात कुंकू दिसत आहे. ती तिचं वय एक ठाम आकडा सांगू शकली असती, मात्र तिने आपलं वय जवळपास 19 वर्ष असल्याचं म्हटलं आहे. परंतु तिच्या चेहऱ्याच्या ठेवणीवरून ती अल्पवयीन असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. शिवाय तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भावही दिसत नाहीत. तिच्या डोळ्यांच्या हालचालींवरून ती जे काही बोलतेय ते समोर लिहिलेलं असून ती फक्त वाचतेय, अशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या आहेत. त्यामुळे ही मुलगी खरंच स्वतःच्या इच्छेने पळून गेली आहे की, तिला कोणी पळून नेलं आहे? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
