सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील इंद्रसेन मोठे यांच्याकडे खिलार जातीचा सोन्या नावाचा बैल होता. शरीराने रुबाबदार खिलारी बाणा असलेल्या सोन्या बैलाच्या डोळ्यातून पाणी यायचं. 2010 मध्ये इंद्रसेन मोठे यांनी गावातील पशु तज्ज्ञ डॉक्टर श्रीहरी शिनगारे यांना दाखवलं. तेव्हा डॉक्टरांनी सोन्याच्या दोन्ही डोळ्यात मांस वाढल्यामुळे शस्त्रक्रिया करून डोळे काढावे लागतील, असे सांगितले.
advertisement
ना मोठा बँड-बाजा, ना लाखोंची उधळण, माजी आमदाराच्या मुलीचं अवघ्या 150 रुपयांत लग्न, PHOTO
सोन्याचे डोळे गेले अन्...
इंद्रसेन मोठे यांना बैलाचा डोळा काढावा लागणार हे ऐकताच धक्का बसला. पण सोन्याच्या प्रेमापोटी बैलाचे दोन्ही डोळे काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे मोठे यांच्या आईला डोळ्यांनी दिसत नव्हतं. मात्र, सोन्याचे दोन्ही डोळे काढावे लागले आणि योगायोग असा की काही दिवसांनी आईला दिसू लागलं, असं मोठे सांगतात.
सोन्या हा दोन्ही डोळ्याने अंध असला तरी इंद्रसेन मोठे यांनी दिलेली हाक त्याला समजत होती. या हाकेवरून सोन्या बैलाने 22 वर्ष शेतातील सर्व कामे केली. त्याच सोन्याचे आता वृद्धापकाळाने निधन झाले. या बैलाच्या सहाय्यानेच मोठे कुटुंबीयांचा खर्च भागवत होता. मुला-बाळांचे शिक्षणही सोन्याच्या कष्टावर झालं, असंही इंद्रसेन यांनी सांगितलं.
कुटुंबातील सदस्य गेल्याचं दु:ख
सोन्या बैल हा इंद्रसेन यांचाच नाही तर पत्नी मनीषा मोठे, साक्षी व सानिका यांचाही लाडका होता. घरामधील लहान मुलं सोन्याच्या अंग खांद्यावर बसून खेळत होते. पण अंध सोन्याने कधीही त्यांना कोणतीही इजा केली नाही. पण आज जग सोडून गेलेल्या सोन्या बैलाच्या आठवणीत इंद्रसेन व त्यांच्या कुटुंबाला एखादा घरातला सदस्य गेल्याचंच दु:ख झालंय.
सोन्याचा पुतळा उभारायचा आहे..
ज्या दावणीला सोन्या बैलाला बांधलं होतं, त्याच दावणीला पकडून संपूर्ण परिवार आज सोन्याच्या आठवणीत रडत आहे. ज्या काळामध्ये सोन्या काम करत होता त्याच काळ्या मातीत अंध सोन्या बैलाची समाधी केली आहे. सोन्या बैलाचा पुतळा उभारण्याची इच्छाही यावेळी शेतकरी इंद्रसेन मोठे यांनी लोकल18 च्या माध्यमातून बोलून दाखवली.





