"सोन्या, डोळे मिटू नको रे..." मालकाच्या एका हाकेसाठी अंध सोन्याने 22 वर्ष मृत्यूला रोखून धरलं; शेतकऱ्याचं काळीज पिळवटून टाकणारं दुःख
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: सोन्या बैल जरी जग सोडून गेला असला तरी निस्वार्थ प्रेमाची ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आजही जिवंत आहे.
सोलापूर: अंध असूनही शेतात राबराबणाऱ्या सोलापूरच्या सोन्या बैलाची कहाणी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली होती. आपल्या मालकावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आणि मालकाच्या डोळ्यांनीच जग पाहणाऱ्या सोन्या बैलानं आता मात्र कायमचेच डोळे मिटले आहेत. सोन्या बैल जरी जग सोडून गेला असला तरी निस्वार्थ प्रेमाची ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात आजही जिवंत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील इंद्रसेन मोठे यांच्याकडे खिलार जातीचा सोन्या नावाचा बैल होता. शरीराने रुबाबदार खिलारी बाणा असलेल्या सोन्या बैलाच्या डोळ्यातून पाणी यायचं. 2010 मध्ये इंद्रसेन मोठे यांनी गावातील पशु तज्ज्ञ डॉक्टर श्रीहरी शिनगारे यांना दाखवलं. तेव्हा डॉक्टरांनी सोन्याच्या दोन्ही डोळ्यात मांस वाढल्यामुळे शस्त्रक्रिया करून डोळे काढावे लागतील, असे सांगितले.
advertisement
सोन्याचे डोळे गेले अन्...
इंद्रसेन मोठे यांना बैलाचा डोळा काढावा लागणार हे ऐकताच धक्का बसला. पण सोन्याच्या प्रेमापोटी बैलाचे दोन्ही डोळे काढून यशस्वी शस्त्रक्रिया केली. विशेष म्हणजे मोठे यांच्या आईला डोळ्यांनी दिसत नव्हतं. मात्र, सोन्याचे दोन्ही डोळे काढावे लागले आणि योगायोग असा की काही दिवसांनी आईला दिसू लागलं, असं मोठे सांगतात.
advertisement
सोन्या हा दोन्ही डोळ्याने अंध असला तरी इंद्रसेन मोठे यांनी दिलेली हाक त्याला समजत होती. या हाकेवरून सोन्या बैलाने 22 वर्ष शेतातील सर्व कामे केली. त्याच सोन्याचे आता वृद्धापकाळाने निधन झाले. या बैलाच्या सहाय्यानेच मोठे कुटुंबीयांचा खर्च भागवत होता. मुला-बाळांचे शिक्षणही सोन्याच्या कष्टावर झालं, असंही इंद्रसेन यांनी सांगितलं.
कुटुंबातील सदस्य गेल्याचं दु:ख
सोन्या बैल हा इंद्रसेन यांचाच नाही तर पत्नी मनीषा मोठे, साक्षी व सानिका यांचाही लाडका होता. घरामधील लहान मुलं सोन्याच्या अंग खांद्यावर बसून खेळत होते. पण अंध सोन्याने कधीही त्यांना कोणतीही इजा केली नाही. पण आज जग सोडून गेलेल्या सोन्या बैलाच्या आठवणीत इंद्रसेन व त्यांच्या कुटुंबाला एखादा घरातला सदस्य गेल्याचंच दु:ख झालंय.
advertisement
सोन्याचा पुतळा उभारायचा आहे..
ज्या दावणीला सोन्या बैलाला बांधलं होतं, त्याच दावणीला पकडून संपूर्ण परिवार आज सोन्याच्या आठवणीत रडत आहे. ज्या काळामध्ये सोन्या काम करत होता त्याच काळ्या मातीत अंध सोन्या बैलाची समाधी केली आहे. सोन्या बैलाचा पुतळा उभारण्याची इच्छाही यावेळी शेतकरी इंद्रसेन मोठे यांनी लोकल18 च्या माध्यमातून बोलून दाखवली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 7:52 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
"सोन्या, डोळे मिटू नको रे..." मालकाच्या एका हाकेसाठी अंध सोन्याने 22 वर्ष मृत्यूला रोखून धरलं; शेतकऱ्याचं काळीज पिळवटून टाकणारं दुःख









