नेहमीप्रमाणे मंदिरातील दानपेटी उघडली गेली, नोटांची मोजणी सुरू होती. तितक्यात एका अधिकाऱ्याच्या हातात 100 रुपयांची एक नोट आली, ज्याच्या आत एक कागदाची घडी घातलेली होती. कुतूहलापोटी ती चिठ्ठी उघडली आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या पायाखालची जमीनच सरकली.
"हे देवा, माझ्या सासूला मृत्यू येऊ दे..."
त्या चिठ्ठीत देवाकडे कोणतीही प्रगती किंवा आशीर्वाद मागितला नव्हता. तर त्यात स्पष्ट शब्दांत लिहिलं होतं, "हे देवा, माझे दुःख दूर कर आणि माझ्या पुढच्या मंदिर भेटीपूर्वी माझ्या सासूचा मृत्यू होऊ दे." श्रद्धेच्या ठिकाणी अशा प्रकारची 'विश' वाचून मोजणी करणारे कर्मचारी काही काळ सुन्न झाले. जिथे लोक कुटुंबाच्या खुशहालीसाठी नवस बोलतात, तिथे थेट एखाद्याच्या मृत्यूची कामना लेखी स्वरूपात मिळणे हे अत्यंत धक्कादायक आणि असामान्य होते.
advertisement
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी या घटनेला 'कौटुंबिक वादाचा कळस' म्हटले, तर काहींनी "माणूस किती वैफल्यग्रस्त झाल्यावर देवाकडे असं मागणं मागतो?" असा प्रश्न उपस्थित केला. ही चिठ्ठी सुनेने लिहिली की जावयाने, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही कारण त्यावर कोणाचेही नाव नव्हते. मात्र, एखाद्या व्यक्तीबद्दलचे विष ओकण्यासाठी देवाच्या दानपेटीचा वापर केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
अशा प्रकारच्या चिठ्ठ्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही, असे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. अनेकदा लोक आपली दुःखे, कागदावर लिहून देवाच्या चरणी अर्पण करतात. पण एखाद्याच्या निधनाची कामना करणे हे टोकाचे पाऊल होते. प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली असली, तरी ही एका भाविकाची 'खाजगी भावना' मानून त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिर हे आस्थेचे आणि विश्वासाचे केंद्र असते. पण या घटनेने एक वेगळाच सामाजिक पैलू समोर आणला आहे. आपल्या खासगी आयुष्यातील कडू आठवणी आणि राग लोक आता थेट देवाच्या दरबारात मांडू लागले आहेत. ज्या ठिकाणी लोक आशेने जातात, तिथेच निराशेपोटी असा टोकाचा संताप व्यक्त होणे, हे कौटुंबिक नात्यांमधील वाढत्या दरीचे संकेत मानले जात आहेत.
देवाला 'सर्वसाक्षी' मानलं जातं, पण अशा प्रकारच्या मागण्यांमुळे श्रद्धेच्या पवित्र वातावरणात काही काळ नक्कीच गंभीर शांतता पसरली होती.
