गॅस गळती अन् होत्याचं नव्हतं झालं
41 वर्षीय संजय हे आपल्या हॉटेलमध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करत होते. पण आठवड्याभरापूर्वी नशिबाने घात केला. गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत संजय पूर्णपणे भाजले गेले. स्थानिक डॉक्टरांनी हात टेकले आणि सल्ला दिला की "दिल्लीला न्या, तरच जीव वाचेल." पण दिल्लीला नेणार कसं? साध्या रुग्णवाहिकेतून नेण्याइतका वेळ संजय यांच्याकडे नव्हता.
advertisement
गावकऱ्यांनी जमवला एक-एक रुपया, पण...
एअर ॲम्ब्युलन्ससाठी 8 लाख रुपयांची गरज होती. संजय यांचा भाऊ आणि नातेवाईकांनी स्वतःची पुंजी खर्च केली, पण तरीही 2 लाख रुपये कमी पडत होते. एअर ॲम्ब्युलन्सच्या शुल्कात पैसे कमी असल्याने विमान उड्डाणाला उशीर होत होता. अशा वेळी गावकरी आणि मित्र मदतीला धावले. कोणाकडून उसने घेतले, तर कोणाकडून कर्ज काढले. प्रत्येक जण या आशेने मदत करत होता की, "आमचा संजय दिल्लीहून बरा होऊन परत येईल." अखेर 2 लाखांची जुळवाजुळव झाली आणि 8 लाख रुपये भरून त्या विमानाने रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळावरून उड्डाण केलं.
अर्ध्या रस्त्यातच यमराजानं घेरलं!
विमान हवेत झेपावलं, सोबत संजय यांची पत्नी अर्चना देवी आणि पुतण्या ध्रुव कुमार यांच्या डोळ्यांत आशेचे किरण होते. पण झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील कर्मातांडच्या जंगलावर नियती दबा धरून बसली होती. तांत्रिक बिघाड झाला की आणखी काही, पण ते विमान थेट जंगलात कोसळले. ज्या प्रवासासाठी नातेवाईकांनी रक्ताचं पाणी करून पैसे जमवले होते, तोच प्रवास संजय, त्यांची पत्नी आणि पुतण्यासह 7 जणांसाठी अखेरचा ठरला.
"आम्ही पैसे गोळा करण्यासाठी धडपडलो, आम्हाला वाटलं दिल्लीतील उपचार त्यांना नवजीवन देतील. पण आम्हाला काय माहीत होतं की आम्ही त्यांच्या मृत्यूच्या प्रवासासाठीच पैसे भरतोय!" असं वक्तव्य गावकऱ्यांनी केलं.
संजय यांच्या आयुष्यातील हा एवढाच संघर्ष नवा नव्हता. 2004 मध्ये नक्षलवाद्यांनी त्यांच्या वडिलांची हत्या केली होती. त्या धक्क्यातून सावरत त्यांनी आपला संसार उभा केला होता. पण आता 13 वर्षांचा शिवम आणि 17 वर्षांचा शुभम या मुलांच्या डोक्यावरचं छत्र एका रात्रीत हरपलं आहे. आई-वडील दोघांच्याही मृत्यूने ही मुलं आता पोरकी झाली आहेत.
माणसाने जीवाचं रान करून उभं केलेलं नातं आणि जमवलेला पैसा नियती एका क्षणात कशी मातीत मिळवते, याचं हे सर्वात भयानक उदाहरण आहे. ज्या पैशांनी जीव वाचायला हवा होता, त्याच पैशांनी त्यांना मृत्यूच्या दारात नेऊन सोडलं, हीच या घटनेतील सर्वात मोठी शोकांतिका आहे.
