उपमुख्यमंत्र्यांना छर्रे लागून किरकोळ दुखापत
हाती आलेल्या माहितीनुसार समारंभ सुरू असतानाच एका व्यक्तीने अचानक पिस्तूल काढून हवेत गोळीबार सुरू केला. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र तेथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत हल्लेखोराला पकडून ताब्यात घेतले.
या घटनेत उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांना गोळीबारातील छर्रे लागल्यामुळे किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे फारूक अब्दुल्ला हे पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हल्लेखोराची ओळख जम्मूतील स्थानिक रहिवासी कमल सिंह जम्वाल अशी झाली आहे. या गोळीबारामागील नेमके कारण काय होते, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
