दिल्लीमध्ये एक अशी जागा आहे, जिथे या पिवळ्या रंगाची मोहकता आणखी खुलून दिसते. ही जागा म्हणजे सूफी संत हजरत निजामुद्दीन औलिया यांचा दर्गा. गेल्या सुमारे 700 वर्षांपासून येथे वसंत पंचमी साजरी केली जात आहे आणि आजही ही परंपरा तितक्याच श्रद्धेने जपली जाते. निजामुद्दीन दर्गामधील वसंत पंचमी हा सांस्कृतिक सलोख्याचा अनोखा उत्सव आहे, जिथे श्रद्धा कोणत्याही धार्मिक सीमांमध्ये अडकलेली नाही. येथे वसंताचं स्वागत संगीत, फुलं आणि प्रेमाने केलं जातं.
advertisement
वसंताचा सूफी उत्सव
वसंत पंचमी हा वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव असून हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. हा दिवस ज्ञान, संगीत आणि कलेची देवी सरस्वतीला समर्पित असतो. पारंपरिकरित्या भक्त पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात, सरस्वती पूजन करतात आणि ऋतूतील नवचैतन्याचा आनंद साजरा करतात.
मात्र निजामुद्दीन दर्गामध्ये हा सण वेगळ्याच स्वरूपात साजरा होतो. येथे वसंत पंचमीला सूफी रहस्यवादाचा स्पर्श लाभलेला आहे, ज्यामध्ये भक्ती, प्रेम आणि मानवतेला सर्वोच्च स्थान दिलं जातं.
गुरू-शिष्याचं हृदयस्पर्शी नातं
या परंपरेचा उगम हजरत निजामुद्दीन औलिया आणि त्यांचे शिष्य अमीर खुसरो यांच्या आयुष्यातील एका अत्यंत भावनिक प्रसंगाशी जोडलेला आहे. आपल्या प्रिय भाच्याच्या निधनामुळे हजरत निजामुद्दीन औलिया खोल दुःखात बुडाले होते. त्यांच्या या वेदना पाहून शिष्य अमीर खुसरो व्यथित झाले.
वसंत पंचमीच्या दिवशी अमीर खुसरो यांनी काही हिंदू भक्तांना पिवळ्या वस्त्रांत, गात-नाचत वसंत पंचमी साजरी करताना पाहिलं. ते दृश्य पाहून त्यांना आपल्या गुरूला दुःखातून बाहेर काढण्याचा मार्ग सापडला.
खुसरो स्वतःही वसंताच्या रंगात रंगले, गात-नाचत मिरवणुकीसह दरगाहमध्ये पोहोचले आणि आपल्या गुरूंच्या चरणी पिवळ्या फुलांची अर्पण केली. शिष्याच्या या प्रेमळ आणि हृदयस्पर्शी कृतीने हजरत निजामुद्दीन औलिया यांचे डोळे पाणावले आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं.
याच घटनेतून निजामुद्दीन दर्गामध्ये वसंत पंचमी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.
श्रद्धा, संगीत आणि एकतेचा उत्सव
आजही वसंत पंचमीच्या दिवशी हजरत निजामुद्दीन औलिया यांचा दर्गा पिवळ्या रंगाच्या सजावटीने आणि फुलांनी न्हाऊन निघते. संपूर्ण परिसर सुगंधी फुलांनी सजलेला असतो. अमीर खुसरो यांचे सूफी कलाम, कव्वाल्या आणि संगीत दरगाहमध्ये घुमू लागतात. भक्तांमध्ये मिठाई वाटली जाते आणि आनंदाचं वातावरण पसरतं.
निजामुद्दीन दर्गामधील वसंत पंचमी हा केवळ एक सण नाही, तर तो प्रेम, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. इथे धर्म, जात, पंथ यांच्या सीमा मिटून जातात आणि मानवतेचं नातं अधिक घट्ट होतं.
