जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर आणि पठाणकोट येथूनही मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत, त्यानंतर दोन्ही ठिकाणी ब्लॅकआउट लागू करण्यात आले. श्रीनगरमध्ये 20 मिनिटांत 50 स्फोटांचे आवाज ऐकू आले. श्रीनगरमधील प्रसिद्ध लाल चौकावरही क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला गेला, पण भारतीय सैन्याने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता, संपूर्ण श्रीनगरमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. जम्मूच्या अखनूर सेक्टर, राजौरी आणि पूंछच्या मेंढर भागातही पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
advertisement
अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झालेली असतानाही पाकिस्तानने पुढच्या चार तासांमध्येच आगळीक केली आहे, त्यामुळे या शस्त्रसंधी करारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पाकिस्तानने लष्करी कारवाई न करण्याच्या परस्पर कराराचे उल्लंघन केले, अशी भूमिका भारत सरकारकडून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत पाकिस्तानकडून भारतात 11 ठिकाणी युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे, असं सरकारच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.