नियोजित प्रवास... पण वाटेतच काळ आडवा आला
मंगळवारी सकाळी शिमल्याच्या चौपाल उपमंडळातून ही बस (HP-66A-2588) आपल्या नियोजित प्रवासासाठी निघाली होती. नेरवा डेपोची ही बस पाँटा साहिबच्या दिशेने जात असताना उत्तराखंडच्या कुआनु-मीनाक रोडवर पोहोचली. रस्ता अरुंद असल्याने समोरून एक वाहन येत होते. त्याला जागा देण्यासाठी चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला, मात्र डोंगराची कडा खचली आणि बस थेट खोल दरीत गेली. बस कोसळताच प्रवाशांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला.
advertisement
दुर्गम दरी अन् मृत्यूशी झुंज!
अपघात झालेला भाग अत्यंत दुर्गम आणि खोल दरीचा असल्याने बचावकार्यात मोठी अडचण येत होती. घटनेची माहिती मिळताच उत्तराखंड राज्य आपत्ती निवारण दलाच्या (SDRF) डाकपत्थर, चकराता आणि त्यूणी येथील तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी दोरखंडांच्या साहाय्याने दरीत उतरून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. चिखल आणि झाडाझुडपांमुळे जखमींना रस्त्यापर्यंत आणताना बचाव पथकाची मोठी ओढाताण झाली.
मदतकार्य आणि प्रशासनाची धावपळ
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. बसचा वाहक जगदीश चंद याने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बसमध्ये ३४ प्रवासी होते. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच हिमाचल आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणा हलल्या असून, मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्याचे काम सुरू आहे. मृतांमध्ये नेमके कोण आहेत, याची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.
