तिरुपती मंदिरात 300 वर्षांहून अधिक काळापासून लाडूचा प्रसाद दिला जातो. या प्रसादाला 'श्रीवरी लाडू' असं म्हणतात. भगवान वेंकटेश्वरला लाडूचा नैवेद्य खूप आवडतो, अशी मान्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुपती तिरुमला देवस्थानम म्हणजेच टीटीडीने तयार केलेले लाडू 15 दिवस खराब होत नाहीत.'
असा आला लाडूमध्ये भेसळ झाल्याचा संशय
advertisement
आंध्र प्रदेशात एन. चंद्राबाबू नायडू यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर टीटीडीच्या पूर्वीच्या कार्यकारी अधिकाऱ्याला हटवण्यात आले, व तिथे आयएएस अधिकारी के. श्यामला राव यांची नियुक्ती करण्यात आली. राव यांनी सांगितलं की, 'टीटीडीकडून देण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादाची चव पूर्वीसारखी नसल्याची तक्रार त्यांच्याकडे आली होती. त्यामुळे या प्रसादाचे नमुने मी तपासणीसाठी पाठवले होते.'
भेसळीची तपासणी कुठे झाली?
टीटीडीने 9 जुलै 2024 रोजी लाडूचे नमुने गुजरातच्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुधन आणि अन्न प्रयोगशाळेतील विश्लेषण आणि शिक्षण केंद्राकडे तपासणीसाठी पाठवले होते. तेथील रिपोर्ट 16 जुलै 2024 रोजी आला.
तिरुपतीच्या लाडूंमध्ये काय सापडलं?
नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या रिपोर्टनुसार, तिरुपतीच्या लाडूमध्ये सोयाबीन, सूर्यफूल, ऑलिव्ह, नारळ, सरकी, फिश ऑइल, बीफ टॅलो आणि लार्ड आढळून आले. बीफ टॅलो प्राण्यांच्या चरबीपासून बनविला जातो. ही चरबी तुपासारखी दिसू लागेपर्यंत तापवली जाते. तर लार्ड डुकराच्या चरबीपासून बनवतात. तो तुपासारखा दिसतो, व शुद्ध तुपात सहज मिसळता येतो.
तूप पुरवठा कोणती कंपनी करते?
टीटीडी दरवर्षी निविदेद्वारे सुमारे 5 लाख किलो तूप खरेदी करते. प्रत्येक महिन्याला देवस्थानला सुमारे 42000 किलो तूप लागते. कंपनी हे तूप मंदिर व्यवस्थापनाला सवलतीच्या दरात पुरवते. 'नंदिनी' या नावाने तूप तयार करणारी प्रसिद्ध दाक्षिणात्य कंपनी कर्नाटक मिल्क फेडरेशन म्हणजेच केएमएफ टीटीडीला तुपाचा पुरवठा करत असल्याचा दावा या पूर्वी करण्यात आला होता. त्यानंतर अमूल कंपनीचे नाव आले होते.
मात्र, टीटीडीला तूप पुरवत नसल्याचं दोन्ही कंपन्यानी स्पष्ट केलंय. केएमएफ कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं की, 'गेल्या 4 वर्षांपासून आम्ही टीटीडीच्या निविदा प्रक्रियेत भाग घेत नाही. कारण बोर्डाचा तुपाच्या दर आम्हाला परवडत नाही. ' तर, दुसरीकडे प्रसादात भेसळ झाल्याची तक्रार करण्यात आली तेव्हा एआर डेअरी फूड्स नावाची कंपनी तिरुपती मंदिराला तूप पुरवत होती. मात्र, राज्य सरकारने या कंपनीचा साठा परत केला आहे.
असा निवडला जातो पुरवठादार
तिरुपतीमध्ये निकृष्ट दर्जाच्या तुपाच्या वापराचा मुद्दा गेल्या वर्षीही ऐरणीवर आला होता. टीटीडी जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाचे तूप खरेदी करत असल्याचा दावा कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष भीमा नायक यांनी केला होता. यावर तत्कालीन टीटीडीचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी म्हणाले होते की, 'बोर्ड निविदांद्वारेच तूप खरेदी करते. दुहेरी टेस्ट उत्तीर्ण झालेल्या पुरवठादारांनाच कंत्राट मिळते. ठेकेदाराची निवड कठोर निविदा प्रक्रियेद्वारे होते.'
लाडू विक्रीतून किती मिळतं उत्पन्न?
टीटीडी पूर्वीच्या कंपनीकडून 320 रुपये किलो दराने तूप खरेदी करत होते. आता राज्य सरकार केएमएफकडून 475 रुपये किलो दराने तूप खरेदी करत आहे. 'नंदिनी' हा केएमएफचा ब्रँड आहे. तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूमध्ये प्रामुख्याने बेसन, बुंदी, साखर, काजू, शेंगदाणे आणि तूप यांचा समावेश असतो. अय्यंगार पंडित हे लाडू बनवतात. टीटीडी हे लाडू विकून दरवर्षी सुमारे 500 कोटी रुपये मिळवते.