इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांवर अमेरिकेने नुकत्याच केलेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर एक चर्चा जोर धरू लागली – की या मोहिमेसाठी अमेरिकेच्या B-2 स्पिरिट बॉम्बर्सने भारताच्या हवाई हद्दीचा वापर केला होता. मात्र, भारत सरकारने या सर्व दाव्यांना स्पष्ट शब्दांत फेटाळलं आहे.
शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री "ऑपरेशन मिडनाइट हॅमर" अंतर्गत अमेरिकेने इराणमधील फॉर्डो, नतांज आणि इस्फाहान या तीन महत्त्वाच्या अण्विक केंद्रांवर जोरदार हल्ला केला. यावेळी अमेरिकेने 13,600 किलो वजनाचे GBU-57 हे ‘बंकर-बस्टर’ बॉम्ब वापरून हे प्रकल्प उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर, विशेषतः X (पूर्वीचं ट्विटर) प्लॅटफॉर्मवर, असा दावा केला गेला की अमेरिकेच्या बॉम्बर्सनी भारताची हवाई हद्द ओलांडून हे मिशन पार पाडलं. काही पोस्ट्समध्ये भारताच्या अप्रत्यक्ष सहभागाचाही उल्लेख करण्यात आला.
या चर्चांना उत्तर देताना भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (PIB) ने रविवारी अधिकृत निवेदन जारी करून सांगितले की, "ऑपरेशन मिडनाइट हॅमरसाठी अमेरिकेने भारताची एअरस्पेस वापरल्याचे दावे पूर्णपणे चुकीचे, निराधार आणि तथ्यहीन आहेत."
PIB ने पुढे स्पष्ट केलं की, "अमेरिकेच्या हल्ल्यात भारताचा कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग नाही. भारताच्या हवाई हद्दीचा वापरही अमेरिकेने केला नसल्याचे ठामपणे स्पष्ट करण्यात आले आहे.