अमेठी, 3 ऑगस्ट : आजकाल सकाळी डोळे उघडताच अनेकांना समोर मोबाईल पाहायचा असतो. याच मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात ऑनलाईन प्रेमप्रकरणं कशी जुळतात हे कळतसुद्धा नाही. सध्या सोशल मीडियावरून जुळलेल्या प्रेमप्रकरणांचा प्रचंड बोलबाला आहे. याबाबत दिवसागणिक एकतरी बातमी वाचायला मिळते. उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्येदेखील सध्या अशीच एक प्रेमकथा तुफान गाजतेय. सोशल मीडियावर ओळख, मैत्री, प्रेम आणि लग्न असं साधं सरळ या प्रेमकथेचं स्वरूप असलं, तरी त्यात एक मोठा ट्विस्ट आहे. यातील प्रियकर आणि प्रेयसी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
advertisement
प्रेयसीच्या कुटुंबीयांनी तिच्या आणि प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर घडलेला सर्व प्रकार समोर आला. 'आमच्या मुलीला फसवून सोबत नेलं आणि फसवून तिच्याशी लग्न केलं', असा आरोप तिच्या नातेवाईकांना केला आहे. आता याप्रकरणी सिलगुडी आणि अमेठी पोलीस तपास करत आहेत.
सीमा हैदर करणार राजकारणात एन्ट्री? 'या' पक्षानं दिली ऑफर
काय आहे नेमकं प्रकरण?
अमेठीच्या कसबा भागातील रहिवासी प्रिन्स बरनवाल आणि पश्चिम बंगालच्या सिलगुडीची रहिवासी निकिता दास या दोघांची सोशल मीडियावरून मैत्री झाली. गप्पा वाढल्यावर दोघांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले. आता चॅटिंगवरील गप्पांचं रूपांतर फोनवरील गप्पांमध्ये झालं होतं. त्यातून मैत्री एवढी घट्ट झाली की, दोघं कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते त्यांनाच कळलं नाही. दोघांना एकमेकांशिवाय राहणं असह्य झालं होतं. त्यामुळे आता लग्न करूया, असा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी निकिता 23 जुलै रोजी आपल्या घरातून पळून प्रियकराला भेटायला अमेठीत आली. दोन दिवसांत 25 जुलै रोजी दोघांनी एका आश्रमात गुरुजींच्या उपस्थितीत विधिवत लग्न केलं. एवढंच नाही, तर मंदिरात लग्न उरकून त्यांनी कोर्टात त्याची नोंददेखील केली.
'मी खूप हट्टी आहे, सर्वांना कोर्टात खेचेन!' 19 वर्षीय तरुणीचा Video Viral
एकीकडे प्रिन्स आणि निकिता लग्न झालं म्हणून प्रचंड आनंदात होते. तर दुसरीकडे निकिताच्या कुटुंबीयांचा जीव मात्र तिच्या काळजीने कासावीस झाला होता. त्यांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. पश्चिम बंगाल पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारावर प्रिन्सचं घर गाठलं. पोलिसांसोबत गेलेल्या निकिताच्या कुटुंबियांना तिला सौभाग्यवती म्हणून पाहून धक्काच बसला. आपल्या मुलीचं खरोखर लग्न झालंय हे त्यांना पटतंच नव्हतं. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, आमच्यासोबत चल, अशी मागणी तिच्याकडे केली. मात्र निकिता प्रिन्सला सोडायला तयार नव्हती.
दरम्यान, दाखल झालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, 'दोघांचे कागदपत्र तपासल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही अल्पवयीन आहेत.'
